Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > संपादकीय > लेख

‌‘धाडसत्र‌’ केवळ ‌‘दिखावा‌’ ठरू नये!


‌‘धाडसत्र‌’ केवळ ‌‘दिखावा‌’ ठरू नये

दिवसेंदिवस समाजात पसरत चाललेली आणि मनुष्याचे आरोग्य पोखरणारी भेसळमाफिया व अवैध व्यवसाय करणाऱ्यांची कीड समूळ नष्ट होणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी नुसती मलमपट्टी न करता ही स्वच्छता मोहीम १२ ही महिने होण्याची गरज आहे. 

राज्याची ‌’सांस्कृतिक राजधानी‌’ आणि ‌’विद्येचे माहेरघर‌’ असे संबोधल्या जाणाऱ्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.  मागील महिन्यात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‌’नीट‌’ परीक्षेच्या ‌’पेपरफुटी‌’मुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सदरच्या प्रश्नपत्रिका पुण्यातील ३ ‌’पेपरसेटर्स‌’नी फोडल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले. या ‌’कारनाम्या‌’च्या बातमीची शाई वाळत नाही तोच, ‌’सुसंस्कृत‌’ पुणे पुन्हा एकदा ‌’विषारी दारुकांडा‌’मुळे बदनाम होऊन चर्चेत आले. मागच्या आठवड्यात पिंपरी चिंचवड, हडपसर, फुगेवाडी, दापोडी या भागांत विषारी दारू प्यायल्याने २२ जणांनी आपला जीव गमावला.
सदरची दुर्घटना घडल्यानंतर, नित्यनियमाप्रमाणे आपले पोलीस खाते; आणि केवळ दिवाळी-दसऱ्याला २/४ छापे टाकून, फक्त खवा आणि मावा जप्त करून बदनाम झालेले अन्न व औषध प्रशासन खाते खडबडून जागे झाले. पुण्याच्या दुर्घटनेनंतर मात्र, अपेक्षेप्रमाणे छापेमारीच्या बातम्यांचा ‌’रतीब‌’च घातला जात आहे. ज्या वेळेस पुण्यात हे ‌’कांड‌’ घडले. तेव्हाच मनात आले की, उद्यापासून ‌’अवैध व्यवसायांवरील धाडसत्रा‌’च्या बातम्या झळकू लागतील. कारण, आपल्या व्यवस्थेला ‌’वरातीमागून घोडे‌’ अशी सवयच जडलेली आहे. अन्न व औषध प्रशासन या खात्याचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण राज्यात अवैधपणे चालणाऱ्या व्यवसायांवर धाडी टाकण्याचे आदेश जारी केले. पुण्याची दुर्घटना घडल्यानंतर ही मोहीम तीव्र करण्यात आली. ‌’अजगरा‌’सारख्या सुस्त पडलेल्या अन्न व औषध प्रशासन खात्याला ‌’चित्त्या‌’सारखा चपळ व तडफदार अधिकारी लाभल्याने खाते मरगळ झटकून वाऱ्याच्या वेगाने कामाला लागले. या मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी शहरातील द्वारकानगर परिसरात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकली.
 यात, रसायने, बाटल्या, लेबल, कच्चा माल आणि ११ लाखांची रोकड, असा सुमारे १४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याच जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दह्याने शिवार आणि विविध भागांत छापे मारून, २२०० लिटर हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली, तर ८२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोलापूर येथे हातभट्टीची दारू आणि २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर अकलूज येथील गांधी चौकातील २ दुकानांवर धाड टाकून, २ लाखांचा भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला. दोन्ही दुकाने सील करून मालकांवर प्रतिबंधित विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि खेड तालुक्यांत वेगवेगळ्या ५ ठिकाणांवर छापे मारत, गुटखा, पानमसाला आणि इतर संशयित अन्नपदार्थ असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. कोल्हापूर येथे अवैधरित्या देशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३.५० लाखांचा माल हस्तगत करण्यात आला, तर कळंब, नवीन वाशी नाका या भागांतून वाहतूक केली जाणारी ६.५ लाखांची दारू ताब्यात घेत, एकाला अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर कासार, केज, पाटोदा, माजलगाव आदी गावांत छापेमारी करत, गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त दूध, पनीर, मसाले, क्रिम, लस्सी, सोयाबीन तेल व तूप, केमिकलने पिकवलेले आंबे, बनावट व मुदतबाह्य औषधे अशा प्रकारचा लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. अशा प्रकारे राज्यांतील विविध जिल्ह्यांत आठवड्यात अनेक ठिकाणी छापे टाकत, सुमारे १०२ भेसळ करणाऱ्या आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांना गजाआड करण्यात आले. २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर जवळपास ८६ दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे. २४ तारखेला एकाच दिवसात ४० कारवाया होऊन २७ दुकाने सील करण्यात आले. आजपर्यंतचा हा अन्न व औषध प्रशासन खात्याचा विक्रमच म्हणावा लागेल. 
एकीकडे विविध जिल्ह्यांत छापेमारीचा धडाका सुरू असताना, सातारा जिल्ह्यातील पाटण येथील काही लाचखोर पोलिसांनी मात्र या मोहिमेला काळिमा फासण्याचे कृत्य केले आहे. पाटण तालुक्यात मल्हारपेठ पोलिसांनी एका गुटखा विक्रेत्याकडे छापा टाकत, मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा जप्त केला होता; पण त्यांनी या कारवाईची कोणतीही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली नाही. जप्त केलेला लाखो रुपयांचा गुटखा व्यापाराला परत देण्यासाठी ८ लाखांची लाच घेतली गेली. याची कुणकुण वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागताच त्यांनी सविस्तर माहिती घेऊन चौकशीलाही सुरुवात केली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ‌’गुटखामाफिया‌’ला अभय देणाऱ्या व मोहिमेला कलंक फासणाऱ्या लाचखोर पोलिसांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.
एखाद्या घडलेल्या दुर्घटनेनंतर, पुन्हा तिची पुनरावृत्ती होऊ नये, याची प्रामाणिकपणे काळजी घेईल तर, ते प्रशासन कसले?  दुर्घटना घडली की, ४/५ दिवस छापेमारी, तपासणी आणि कारवाईचे नाटक केले जाते. प्रकरण थंड झाले की, पुन्हा ‌’मागच्या पानावरून पुढे‌’ असा प्रकार सुरू होतो.
दिवसेंदिवस समाजात पसरत चाललेली आणि मनुष्याचे आरोग्य पोखरणारी ही कीड समूळ नष्ट होणे, ही ‌’काळाची गरज‌’ आहे. त्यासाठी नुसती मलमपट्टी न करता ही स्वच्छता मोहीम १२ ही महिने होण्याची गरज आहे. अर्थात, सध्या अवैध व्यावसायिकांचा ‌’कर्दनकाळ‌’ ठरलेल्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला सरकार या पदावर किती दिवस ठेवते? किंवा कंबरडे मोडलेले अवैध धंदे करणारे व्यावसायिक; आणि त्यांच्याशी लागेबांधे असणारे राजकारणी त्यांना किती दिवस ठेवतील? हाच मोठा कळीचा मुद्दा आहे. 


प्रदीप व्ही. खोलमकर
नाशिक | मो. ८७६७५९२९८०
 

Related to this topic: