Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > संपादकीय > अग्रलेख

मुद्दा प्रतिष्ठेचा....!


मुद्दा प्रतिष्ठेचा

इराण आणि अमेरिका यांच्यात दीर्घ काळापासून सुरू असलेली बोलणी अद्यापही अंतिम निष्कर्षावर पोहोचलेली नाही. इराणपेक्षा अमेरिकेलाच सध्या सुरू असलेले युद्ध संपावे आणि तणाव निवळावा असे वाटत असले तरी दोन्ही देशांनी प्रतिष्ठेचा केलेला एक मुद्दा सध्या मोठा अडसर बनला आहे. हा मुद्दा आहे इराणमध्ये असलेल्या समृद्ध युरेनियमचा. इराणने त्यांच्याकडे असलेले समृद्ध युरेनियम एक तर नष्ट करावे किंवा अमेरिकेला सोपवावे असे ट्रम्प यांना वाटत आहे, तर इराणने आपल्याकडील समृद्ध युरेनियम हा देशाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे. मागच्या वर्षी अमेरिका आणि इस्रायलने ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणच्या अणू तळांवर भीषण लष्करी हल्ले केले होते. त्यामागचा उद्देश इराणची अण्वस्त्र निर्मिती क्षमता कायमची संपुष्टात आणणे किंवा इराणकडे असलेले युरेनियम नष्ट करणे हाच होता. परंतु इराणने हा समृद्ध युरेनियमचा साठा जमिनीखाली सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवला. या युरेनियम वादाची मुळे २०१५ मध्ये झालेल्या इराण न्युक्लिअर करारात रूतलेली आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणला अणू बॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय करार केला होता. या करारांतर्गत इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध शिथिल करण्यात आले होते, त्या बदल्यात इराणने त्यांचे अणू कार्यक्रम मर्यादित ठेवणे बंधनकारक होते. हा करार इराणलाही मान्य होता आणि त्याची योग्य अंमलबजावणी देखील सुरू होती. मात्र २०१८ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार अत्यंत कमकुवत आणि अमेरिकेच्या हिताचा नसल्याचे सांगत रद्द केला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी जगावर येणारे भविष्यातील संकट लक्षात घेऊन इराणशी केलेल्या अणू करार ट्रम्प यांनी रद्द करुन आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे झाले आहे. नंतरच्या काळात इराणने युरेनियम शुद्धीकरणाचा वेग प्रचंड वाढवला. अणू बॉम्ब बनवण्यासाठी वेपन्स-ग्रेड युरेनियमची आवश्यकता असते. सध्या इराणकडे सुमारे ४०० ते ४४० किलो इतके शुद्ध केलेला युरेनियमचा साठा उपलब्ध आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या मते, इराण या साठ्यापासून आठवड्यात किंवा महिन्याभरात प्रत्यक्ष अणुबॉम्बसाठी लागणारे साहित्य तयार करू शकतो. अमेरिका आणि इस्रायलने ज्या पद्धतीने इराणवर एकतर्फी हल्ला चढवला आणि अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला ते पाहता इराण आता या युद्धातून माघार घेण्याची शक्यता कमी आहे. त्यातच अमेरिका आणि इजरायलने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला गारद करून इराणचा     राष्ट्राभिमान दुखावून ठेवला आहे. त्यामुळे पुढच्या काळात या तणावावर तोडगा निघाला तरी इराण आपले युरेनियम अमेरिका किंवा अन्य कोणत्या देशाला हस्तांतरित करण्याची शक्यता फार कमी आहे. फार तर आपला अणू कार्यक्रम काही काळ पुढे ढकलण्याची तयारी इराण दाखवू शकतो. इराणसाठी त्यांचे समृद्ध युरेनियम राष्ट्राची प्रतिष्ठा बनले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी इराण अण्वस्त्रे विकसित करणार नाही अशी हमी इराणकडून मिळवली आहे. त्यांनी तेहरानला आणखी कठोर शांतता प्रस्ताव पाठवल्याच्याही माहिती समोर आली आहे. परंतु इराण युरेनियमच्या मुद्द्यावर सौदेबाजी करेल असे वाटत नाही. इराण आता अमेरिकेवर विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत नाही. अमेरिका गोड बोलून किंवा अमिषे दाखवून आपल्याकडून समृद्ध युरेनियम काढून घेईल आणि नंतर आपल्यावर अनेक जाचक अटी लादून आपल्याला कायमचे आर्थिक गुलामीत ढकलेल ही सार्थ भीती इराणी नेत्यांना वाटत आहे. आपल्याकडे असलेले युरेनियम हा आपल्या हातातील एक हुकमाचा एक्का आहे याची जाणीव इराणी नेत्यांना आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्यासाठी देखील इराणकडून युरेनियम हस्तगत करणे हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. या मुद्द्यावर भविष्यात काही सन्मानजनक तोडगा निघाला तर ठीक अन्यथा हा संघर्ष दीर्घकाळ चालू राहू शकतो. सध्या दोन्ही देशात तात्पुरता युद्धविराम असला, तरी ट्रम्प यांनी इराणसमोर युरेनियम नष्ट करण्याची आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची कडक अट ठेवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कदाचित खुली होईलही, परंतु इराण आपले युरेनियम कधीही नष्ट होऊ देणार नाही.

Related to this topic: