Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > संपादकीय > लेख

असेच चालू राहिले तर समाज माध्यमांवर बंधने येणार ?


असेच चालू राहिले तर समाज माध्यमांवर बंधने येणार

काही लोक अत्यंत बेजबाबदारपणे समाज माध्यमांचा वापर करतात. परिणामी प्रशासन आणि नागरिक दोघांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागतो. चुकीच्या पोस्ट, अफवा किंवा भडकाऊ संदेशांमुळे अनेक शहरांमध्ये तणाव निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत.

'सोशल मीडिया की ताकत का 
सही इस्तेमाल होना चाहिए,
झूठ और नफरत से  
हर इंसान को बचना चाहिए।'

आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमे हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली माध्यम म्हणून ओळखले जात आहे. या माध्यमातून क्रांती घडू शकते, मोठ्या प्रमाणात लोक संघटित होऊ शकतात आणि जनमत तयार होऊ शकते. अलीकडील काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नव्या डिजिटल चळवळी आणि समूह अल्पावधीतच लाखो लोकांपर्यंत पोहचल्याची उदाहरणे समोर आली आहेत. 'कॉकरोच जनता पार्टी' हे पण एक ताजे उदाहरण मानले जात आहे. जगाची लोकसंख्या ८३० कोटी असून त्यापैकी जवळपास ६०० कोटी लोक विविध समाज माध्यमांचा वापर करतात. त्यामुळे या माध्यमांचा वापर किती जबाबदारीने केला गेला पाहिजे, यावर गंभीर चिंतन होणे आवश्यक ठरते.
माध्यमांच्या प्रवासाकडे पाहिले तर सुरुवातीला मुद्रित माध्यमे अर्थात वृत्तपत्रे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, विविध टीव्ही वाहिन्या आणि न्यूज चॅनेल्स आले. पुढे संगणकाच्या माध्यमातून सायबर मीडिया विकसित झाला आणि आता मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया सर्वसामान्यांच्या हातात पोहोचला आहे. समाजजागृती, आपत्तीच्या काळात मदतकार्य, भ्रष्टाचार उघड करणे, शिक्षण, रोजगार आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविणे, आदी सकारात्मक बाजू सोशल मीडियाच्या आहेत. मात्र सोशल मीडिया हे असे माध्यम आहे की, त्याचा वापर थेट नागरिकच करतात. त्यामुळे त्याची विश्वासार्हता अनेकदा प्रश्नचिन्हाखाली येते.
काही लोक अत्यंत बेजबाबदारपणे समाज माध्यमांचा वापर करतात. परिणामी प्रशासन आणि नागरिक दोघांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागतो. चुकीच्या पोस्ट, अफवा किंवा भडकाऊ संदेशांमुळे अनेक शहरांमध्ये तणाव निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. काही ठिकाणी धर्म, जात किंवा गटांमध्ये संघर्ष निर्माण झाले. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला.
दुसरीकडे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, एक्स, लिंकदिन, यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांवर लोक ज्या पद्धतीने व्यक्त होतात, ते पाहून आश्चर्य वाटते. आता कृत्रिम बुद्धिमत्ता (Aघ्) आल्यामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. खोटे फोटो, बनावट व्हिडिओ आणि दिशाभूल करणार्‍या पोस्ट व व्हीडिओ तयार करून मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जातात. त्या इतक्या विश्वासार्ह वाटतात की सामान्य नागरिक त्यावर सहज विश्वास ठेवतात. परिणामी संबंधित व्यक्तींना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. विशेष म्हणजे, काही व्यक्ती मोठ्या नेत्यांबद्दल, समाजसेवकांबद्दल, कलाकारांबद्दल किंवा प्रतिष्ठित नागरिकांबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत प्रतिक्रिया लिहितात. अश्लील भाषा, शिवीगाळ आणि अपमानास्पद शब्दांचा सर्रास वापर केला जातो. कुणाचीही कितीही बदनामी करा, समाज माध्यम आपल्या हातात आहे, आपले काहीही बिघडणार नाही, अशा मानसिकतेने अनेक लोक वागताना दिसतात. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर काही प्रमाणात नियंत्रण किंवा अंकुश असावा, अशी मागणी करणारा एक वर्गही तयार झाला आहे.
मात्र सरकारने याबाबत कायदा व  नियम आणण्याचा प्रयत्न केला तर लगेच हुकूमशाही, मुस्कटदाबी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप होईल. एका बाजूला काही लोक स्वातंत्र्याचा गैरवापर करतात, तर दुसर्‍या बाजूला समाजात शांतता राखण्यासाठी सरकारने पावले उचलली तर त्यालाच विरोध केला जाईल. त्यामुळे ही कोंडी फुटणार तरी कशी, हा प्रश्न आहे.
एकूणच समाज माध्यमांवर व्यक्त होताना सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. मतभेद असू शकतात, टीका असू शकते, संतापही असू शकतो; परंतु तो सभ्य भाषेत व्यक्त करता येतो. शिवीगाळ, अपमान आणि द्वेष यामुळे कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही. 
शेवटी समाज माध्यमे ही केवळ मनोरंजनाची साधने नाहीत, तर ती समाज परिवर्तनाची प्रभावी साधने आहेत. मात्र त्याचा वापर स्वातंत्र्य आणि जबाबदारी या दोन्हींचा समतोल राखून झाला पाहिजे. या माध्यमातून सामाजिक शांतता, सुव्यवस्था आणि लोकजागृतीसाठी मोठे योगदान देता येते. प्रशासनातील चुका समोर आणून योग्य कारवाईही घडवून आणता येते. अन्यथा हेच प्रभावी शस्त्र समाजात अविश्वास, व्देष आणि अस्थिरता निर्माण करणारे शस्त्र ठरु शकते. सोशल मीडियावर बंधने आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनीच आत्मनियंत्रण स्वीकारणे अधिक गरजेचे आहे. शेवटी या आशयाचा शेर आठवतो...
'कलम हो या मोबाइल, दोनों में ताकत बड़ी होती है,
गलत हाथों में जाए, तो मुश्किलें खड़ी होती हैं।'

डॉ. राजेश राजोरे
९८२२५९३९०३
खामगाव, जि. बुलडाणा 
(लेखक हे दैनिक देशोन्नतीच्या बुलडाणा आवृत्तीचे संपादक तसेच पत्रकारितेत पीएच.डी.पदवी प्राप्त आहेत.)

Related to this topic: