मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, 17 ऑगस्ट 2026 ही अर्ज सादर करण्याची महत्त्वाची अंतिम तारीख आहे.
Special Intensive Revision मोहिमेसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू; अर्जानंतर Reference ID जतन करणे आवश्यक, अडचण आल्यास BLO शी संपर्क साधा
मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, 17 ऑगस्ट 2026 ही अर्ज सादर करण्याची महत्त्वाची अंतिम तारीख आहे. निर्धारित मुदतीपर्यंत आवश्यक नोंदणी न झाल्यास काही प्रकरणांमध्ये मतदार यादीतील नोंदीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पात्र मतदारांनी वेळेत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमध्ये भारताच्या निवडणूक आयोगाचे अधिकृत ECINet अॅप डाउनलोड करावे. त्यानंतर अॅपमधील "Search Your Name in Last SIR" या पर्यायावर जाऊन राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडावा. यानंतर 2002 च्या SIR यादीमध्ये स्वतःचे किंवा आई-वडील अथवा आजी-आजोबांचे नाव शोधून त्याचा स्क्रीनशॉट सुरक्षित जतन करून ठेवावा.
त्यानंतर Voter Registration Forms विभागात जाऊन "Special Intensive Revision – Fill Enumeration Form Online" हा पर्याय निवडावा. नवीन वापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक आणि OTP च्या मदतीने नोंदणी करावी, तर आधीपासून खाते असलेल्या नागरिकांना थेट लॉगिन करून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.
फॉर्म भरताना महाराष्ट्र राज्य निवडून EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करावा. माहिती पडताळल्यानंतर योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. 2002 च्या SIR यादीत स्वतःचे नाव असल्यास पहिला पर्याय, आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव असल्यास दुसरा, सध्याच्या मतदार यादीतील घरातील सदस्याचे नाव असल्यास तिसरा, तर उर्वरित अर्जदारांनी चौथा पर्याय निवडावा.
यानंतर वैयक्तिक माहिती, नातेवाईकांची माहिती, जन्मतारीख आणि इतर आवश्यक तपशील भरून नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. सर्व माहितीची पुन्हा एकदा खात्री करून घोषणा (Declaration) स्वीकारल्यानंतर आधार OTP च्या मदतीने e-Sign प्रक्रिया पूर्ण करावी.
अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर मिळणारा Reference ID सुरक्षित जतन करून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात अर्जाची स्थिती तपासण्यासाठी याच क्रमांकाचा उपयोग होणार आहे.
दरम्यान, नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत असल्यास, मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास किंवा OTP संदर्भात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास वेळ न घालवता संबंधित BLO (Booth Level Officer) यांच्याशी संपर्क साधून ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.