मुंबई आणि पुण्यात अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीपासून 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील दुर्घटनेपर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर; हिंदी, रेल्वे भरती आणि राम मंदिरातील कथित चोरीवरही स्पष्ट भूमिका
मुंबई आणि पुण्यात अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील खांबाचा भाग कोसळल्याची घटना चर्चेत आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, कोणतीही भाषा वाईट नसते. मात्र महाराष्ट्रावर कोणतीही गोष्ट जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याविरोधात सजग राहणे आवश्यक आहे. "बेसावध राहू नका. पायाखालची जमीन एकदा गेली, तर ती पुन्हा सहज मिळत नाही," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी रेल्वे भरती प्रक्रिया, रेल्वे स्थानकांवरील निर्णय आणि विविध स्टॉलचे वाटप कोणाला केले जात आहे, याकडेही नागरिकांनी बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली. या बाबींकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, राज्य सरकारच्या हिंदीविषयक भूमिकेवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाचाही उल्लेख केला.
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पातील खांब कोसळल्याच्या घटनेवर बोलताना राज ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केले. "पाऊस झाला, खांब कोसळला आणि त्यावर प्रश्न विचारले की राजकारण करू नका असे सांगितले जाते. पण विरोधात असताना आंदोलनं करणं, आरोप करणं हे राजकारण नव्हतं का? आता सत्तेत आल्यानंतर प्रश्न विचारले की ते राजकारण कसं ठरतं?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही," असे केलेल्या वक्तव्यावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित केला तर देशविरोधी ठरवले जाते आणि 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगितले जाते. "मग नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारायचेच नाहीत का?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावरही राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मंदिराबद्दल श्रद्धा असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, देशातील भाविकांनी श्रद्धेने दानपेटीत जमा केलेल्या पैशांबाबत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप असेल, तर त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. अशा विषयावर बोलणे म्हणजे धर्माचा अपमान होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पूर्वी आणि आताच्या परिस्थितीची तुलना केली. यापूर्वी सुमारे एक हजार मिलिमीटर पावसानंतर मुंबईची अवस्था गंभीर झाली होती. मात्र यावेळी अंदाजे ३०० ते ३५० मिलिमीटर पावसातही शहर तुंबल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. विरोधात असताना अशाच परिस्थितीवर आंदोलन करणारे आता त्यालाच नैसर्गिक घटना म्हणत असल्याचा आरोप करत त्यांनी हा दुटप्पीपणा असल्याचे म्हटले.