Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > महाराष्ट्र

Political Meeting

जयंत पाटील आणि शिंदेंची बंद दाराआड चर्चा;संजय राऊत म्हणाले, 'ते फ्री बर्ड्स आहेत'

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या घडामोडींना वेग आला आहे.


जयंत पाटील आणि शिंदेंची बंद दाराआड चर्चासंजय राऊत म्हणाले ते फ्री बर्ड्स आहेत

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेपैकी जवळपास अर्धा तास जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे विविध पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात. त्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली, तर ते आठवले यांच्या पक्षात जाणार आहेत, असे म्हणणार का? देशात आणि महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे नेत्यांमध्ये भेटीगाठी होत असतात. ते 'फ्री बर्ड्स' आहेत, त्यांना भेटू द्या."

दरम्यान, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय स्तरावर विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्या बैठकीला प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली भेट राज्यातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना कारणीभूत ठरत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भविष्यात एनडीएमध्ये सामील होणार का, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान स्वतः शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने भविष्यात एनडीएमध्ये प्रवेश केल्यास महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खाते किंवा अर्थमंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Related to this topic: