International Dark Sky: नाशिक जिल्ह्यातील उधमाळ गाव भारतात पहिले अंधारमय आकाश (डार्क स्काय) समुदाय म्हणून मान्यता मिळवले आहे. या योजनेत खगोलशास्त्राच्या शोधासाठी, विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक दृष्टीकोन
नाशिक (International Dark Sky) : पर्यटनाने समृद्ध, हिरवाईने नटलेले आणि आध्यात्मिक वारसा लाभलेले नाशिक आता आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण ओळखीच्या उंबरठ्यावर आहे. नाशिक जिल्ह्यातील उधमाळ हे गाव डार्क स्काय इंटरनॅशनल या संस्थेकडून प्रमाणित होणारे भारतातील पहिले अंधारमय आकाश समुदाय गाव ठरणार आहे. या उपक्रमासाठी आवश्यक निधीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
उधमाळ हे गाव नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आहे. येथे (International Dark Sky) अंधारमय आकाश समुदाय विकसित होत असल्याने खगोलशास्त्रज्ञांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करणे, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती विकसित करण्याच्या मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उधमाळचे नैसर्गिकरीत्या स्वच्छ व अंधारमय आकाश विद्यार्थ्यांसाठी अवकाश निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
पेसा कायद्यांतर्गत अंधारमय आकाशाचे संवर्धन आणि जबाबदार बाह्य प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देणारा ठराव उधमाळ ग्रामसभेने मंजूर केला आहे. या ठरावाद्वारे प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रकाशयोजनांचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०२६-२७ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून रु. ४२.१४ लाख निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून जनजागृती कार्यक्रम, जबाबदार प्रकाशयोजना, रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन तसेच स्थानिक युवकांचे प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीमार्फत पर्यटन विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांमध्ये खगोल पर्यटन ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. या (International Dark Sky) उपक्रमामुळे उधमाळ व परिसरातील नागरिकांना नैसर्गिक वारसा जपत शाश्वत उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाच्या प्रस्तावित राज्य अंधारमय आकाश धोरणाशी हा उपक्रम सुसंगत असून, रात्रीच्या आकाश संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा राज्यात अग्रणी भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.
रात्रीचे नैसर्गिक आकाश जपणे ही केवळ वैज्ञानिक नव्हे, तर पर्यावरणीय गरजही बनली आहे. प्रकाश प्रदूषणावर नियंत्रण आल्यास जैवविविधतेचे संरक्षण, ऊर्जा बचत आणि भावी पिढ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण करण्यास मोठी मदत होईल. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागाची वेगळी ओळखही घडू शकते.