Mumbai Mayor Bungalow: बंगल्याच्या दुरुस्ती व सुशोभीकरणावर 4 कोटी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे सहा महिन्यांत या बंगल्यावर सुमारे 7 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने मुंबईकर तीव्र नाराजी
मुंबई (Mumbai Mayor Bungalow) : मुंबईच्या विकासाच्या नावाखाली महापौरांच्या भायखळा येथील अधिकृत बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा मोठे टेंडर काढण्यात आले आहे. बंगल्याच्या बाह्य परिसरातील विविध सुविधा उभारण्यासाठी तब्बल 2 कोटी 89 लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अवघ्या चार महिन्यांत बंगल्याच्या दुरुस्ती व सुशोभीकरणावर 4 कोटी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे सहा महिन्यांत या बंगल्यावर सुमारे 7 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने मुंबईकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिकेच्या (Mumbai Mayor Bungalow) मुदत ठेवी विकासकामांसाठी मोडल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर टीका करत आहेत. अशात महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत निवासस्थानावरील कोट्यवधींच्या खर्चामुळे हा वाद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. नवीन महापौर वास्तव्याला येण्यापूर्वी बंगल्याच्या दुरुस्ती, सुशोभीकरण आणि इतर कामांसाठी 75 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर स्थायी समितीने 3 कोटी 40 लाख रुपयांच्या नूतनीकरण प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
आता नव्या टेंडरमध्ये ई. एस. पाटनवाला रोडलगत वाहतुकीचा आवाज कमी करण्यासाठी नॉइज बॅरिअर, पर्जन्यजल व सांडपाणी वाहिन्या, इंटरलॉकिंग काँक्रीट पेव्हर्स तसेच भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. 6 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या बंगल्यावर एवढा मोठा खर्च का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत असून यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.