9 ऑगस्टला नागपुरात भव्य लाँग मार्च
नागपूर (Independent Vidarbha State) : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये जनजागृती, जनसंपर्क आणि जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली.
समितीच्या वतीने 9 ऑगस्ट 2026 (क्रांती दिन) रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या (Independent Vidarbha State) आंदोलनात विदर्भातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी ॲड. वामनराव चटप यांनी सांगितले की, विकास निधी, सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याचा समितीचा आरोप आहे. या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच, युवकांचे वाढते स्थलांतर, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि अपुऱ्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत या (Independent Vidarbha State) आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळत असल्याचा दावा समितीने केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था, शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी आणि युवकांनी या (Independent Vidarbha State) जनआंदोलनात सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेला मुकेश मसुरकर (प्रांताध्यक्ष, युवा आघाडी), अरुण केदार (अध्यक्ष, पूर्व विदर्भ), डॉ. रमेश गजबे (कोर कमिटी सदस्य), प्रशांत नखाते (नागपूर जिल्हाध्यक्ष), नरेश निमजे (नागपूर शहराध्यक्ष) आणि भोजराज सरोदे उपस्थित होते.