Latur District Kharif Season: जुलै महिना सरत आला तरीही लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले असतानाही लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा
महादेव कुंभार
लातूर (Latur District Kharif Season) : जुलै महिना सरत आला तरीही लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले असतानाही लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरविली आहे. आत्तापर्यंत लातूर जिल्ह्यात केवळ 1 लाख 54 हजार 640 हेक्टर्स क्षेत्राचा विमा उतरविला गेला आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या केवळ 75 टक्के पेरा झाला असून शेतकऱ्यांनी केवळ 26 टक्के क्षेत्राचा पीक विमा हप्ता भरला आहे. जिल्ह्यात अद्यापही 25 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली नसल्याने यंदा पीकविमा हप्ता भरण्यास मुदतवाढ मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
लातूर जिल्हा हा खरीप हंगामी (Latur District Kharif Season) व रब्बी हंगामी असा दोन्ही हंगामाचा जिल्हा आहे. याशिवाय या जिल्ह्यामध्ये उसाचे क्षेत्र भरपूर आहे. शिवाय इतर बागायती क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आहे. तरीही लातूर जिल्ह्यामध्ये वळपास सहा लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा केला जातो. सरकारी आकडेवारीनुसार 586101 हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप घेतले जाते. यापैकी सध्या 436571 हेक्टर क्षेत्रामध्ये खरिपाची पेरणी झाली आहे. लातूर तालुक्यात 67786 पैकी 46530 हेक्टरवर म्हणजे 68 टक्के, औसा तालुक्यात 96 हजार 846 हेक्टर पैकी 77 हजार 306 हेक्टर म्हणजे 80 टक्के, अहमदपूर तालुक्यात 65 हजार 637 पैकी 56 हजार 520 म्हणजे 86 टक्के, निलंगा तालुक्यात 97 हजार 256 पैकी 71 हजार 738 म्हणजे 74, शिरूर आनंतपाळ तालुक्यात 26515 पैकी 12550 हेक्टरवर म्हणजे 47, उदगीर तालुक्यात 62 हजार 916 पैकी 44,150 हेक्टरवर म्हणजे 70 टक्के, चाकूर तालुक्यात 57,939 पैकी 35 हजार 432 म्हणजे 61 टक्के, रेणापूर तालुक्यात 47 हजार 93 पैकी 42 हजार 645 म्हणजे 90 टक्के, देवणी तालुक्यात 34,252 पैकी 20141 हेक्टर म्हणजे 59 टक्के, तर जळकोट तालुक्यात 29 हजार 861 हेक्टर पैकी 29 हजार 259 हेक्टरवर म्हणजे 99 टक्के खरिपाचा पेरा झाला आहे.
एकीकडे पेरणीचे क्षेत्र पाहता जिल्ह्यामध्ये जळकोट तालुका 99, रेणापूर 90 आणि अहमदपूर 86 टक्के पेरणी झाल्याने हे तीन तालुके खरीप पेरणीत अग्रस्थानी आहेत. याउलट अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने शिरूर अनंतपाळ 47, देवणी 59 आणि चाकूर 61 हे तीन तालुके पेरणीमध्ये मागे पडले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 2019 हजार 992 शेतकऱ्यांनी एक लाख 54 हजार 640 हेक्टर क्षेत्राचा खरीप पीकविमा हप्ता भरला आहे.
गतवर्षीचा पीकविमा न मिळाल्याने....
जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी 52 टक्के पाऊस झाला असून पेरणी 75 टक्के झाली आहे. जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये खरे तर पीकविमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणे अपेक्षित आहे. मात्र लातूर जिल्ह्यामध्ये पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. गतवर्षी पीक विमा हप्ता भरूनही व खरिपात मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. (Latur District Kharif Season) अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. सरकारने अतिवृष्टी झाल्याचे मान्य करीत शेतकऱ्यांना अनुदानही दिले.
वास्तविक अनुदान देत सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, हे मान्य करूनही पीकविमा देण्यास मात्र अद्याप टाळाटाळ केली. याचा अर्थ सरकार पीक विमा कंपनीला पाठीशी घालण्याचे काम जाणीवपूर्वक करीत आहे, हे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा हप्ता भरण्याकडे यंदा पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच पीक विमा जोखमीसाठी असलेले नियम बदलले गेल्याने शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.