ESI Hospital: हाराष्ट्रातील सुमारे 49 लाख सभासद व 1 कोटी 92 लाख लाभधारक असलेल्या कामगार राज्य विमा योजना ( इ एस आय सी) अधिक सक्षम
कामगार व आरोग्यमंत्र्यांची हमी: मजदूर संघासोबत झाली बैठक
लातूर (ESI Hospital) : महाराष्ट्रातील सुमारे 49 लाख सभासद व 1 कोटी 92 लाख लाभधारक असलेल्या कामगार राज्य विमा योजना ( इ एस आय सी) अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात इ एस आय रुग्णालये (ESI Hospital) आणि प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात दवाखाने सुरू करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण हमी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर व आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिली.
भारतीय मजदूर संघाच्या वतीने 16 एप्रिल 2026 रोजी आयोजित मोर्चाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी दि.12 मे 2026 रोजी मंत्रालयातील कामगार मंत्र्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ही हमी देण्यात आली. या (ESI Hospital) बैठकीस कामगार राज्य विमा योजना आयुक्त रमेश चव्हाण, संचालक श्रीमती अनुलेखा झा, रिजनल डायरेक्टर, कामगार आयुक्त डॉ.हनुमंत तुम्मोड, कामगार उपायुक्त लक्ष्मण भुजबळ तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तर भारतीय मजदूर संघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष अॅड. बाळकृष्ण कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सुरेश पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अशोक निकम, नागपूर सेक्रेटरी हर्षल ठोंबरे, सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत भारतीय मजदूर संघाने राज्यातील इ एस आय योजनेतील गंभीर त्रुटी व कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. राज्यात इ एस आय योजनेअंतर्गत मंजूर 2400 बेड क्षमतेपैकी केवळ 1204 बेड उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. ठाणे, पालघर, रायगड यांसारख्या 20 लाखांहून अधिक सभासद असलेल्या भागात एकही इ एस आय रुग्णालय नसल्याची गंभीर बाबही मांडण्यात आली.
अल्प दवाखाने, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि निकृष्ट दर्जाच्या व्यवस्थेमुळे कामगारांकडून नियमित योगदान जमा होत असूनही त्यांना योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याकडे संघटनेने सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातून इ एस आय योजनेसाठी सर्वाधिक निधी जमा होत असतानाही राज्यातील कामगारांवर अत्यल्प खर्च होत असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. भारतीय मजदूर संघाने मांडलेल्या मुद्यांशी सरकारने सहमती दर्शवून राज्यातील मंजूर 18 नवीन इ एस आय रुग्णालयांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात इ एस आय दवाखाने सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
कंत्राटी कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
कंत्राटदार बदलला तरी कामगारांचा जुना इ एस आय (ESI Hospital) नंबर कायम सुरू राहील. तसेच त्याच इ एस आय क्रमांकाच्या आधारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी उपचार योजनांअंतर्गत सर्व वैद्यकीय लाभ पूर्ववत मिळत राहतील, अशी स्पष्ट भूमिका सरकारने या बैठकीत अधोरेखित केली. यामुळे कंत्राटी कामगारांच्या वैद्यकीय सुविधा, उपचारातील सातत्य आणि सामाजिक सुरक्षेला मोठा दिलासा मिळणार आहे.