Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर

Ayodhya Ram Temple

राम मंदिर देणगी प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात; ‘गावागावात जाऊन जनतेसमोर हा मुद्दा मांडणार’

अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्या, पैसे आणि मौल्यवान दागिन्यांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे.


राम मंदिर देणगी प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर घणाघात ‘गावागावात जाऊन जनतेसमोर हा मुद्दा मांडणार’

‘1400 कोटी रुपयांची चोरी झाली’ असा भास्कर जाधवांचा आरोप; उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ आंदोलनाच्या हाकेनंतर शिवसेना (उबाठा) आक्रमक

रत्नागिरी : अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्या, पैसे आणि मौल्यवान दागिन्यांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित याचिकांची दखल घेतल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल तीव्र केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा’ आंदोलनाची हाक दिल्यानंतर आता आमदार भास्कर जाधव यांनीही भाजपवर जोरदार टीका करत हा मुद्दा गावागावात नेण्याची घोषणा केली आहे.

राम मंदिराशी संबंधित कथित देणगी गैरव्यवहाराचा विषय सोडणार नसल्याचे सांगत भास्कर जाधव यांनी मतदारसंघातील विविध भागांत सभा घेण्याची भूमिका मांडली. पक्षाचे बॅनर न घेता रामाचा बॅनर आणि भगवा झेंडा घेऊन लोकांमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

‘यांचा खरा चेहरा समोर आणण्याची संधी’

भाजपवर निशाणा साधताना भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. “कलियुगातले सगळ्यात लुटारू हे लोक आहेत. यांचा खरा चेहरा समोर आणायची संधी रामाने आपल्याला दिली आहे,” असे ते म्हणाले.

या प्रकरणाबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी गावागावात जाण्याची घोषणा केली. पक्षीय बॅनरऐवजी रामाचा बॅनर आणि भगवा झेंडा घेऊन मतदारसंघातील प्रत्येक भागात सभा आयोजित करणार असल्याचे जाधव यांनी म्हटले.

भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “हे खरे हिंदुत्ववादी नाहीत, तर हिंदुत्वाचे मारेकरी आहेत,” अशी टीका करत त्यांनी 2029 च्या निवडणुकीच्या संदर्भातही भाजपवर जोरदार राजकीय हल्ला चढवला.

‘1400 कोटी रुपयांची चोरी झाली’ असा आरोप

राम मंदिराशी संबंधित प्रकरणावर बोलताना भास्कर जाधव यांनी 1400 कोटी रुपयांच्या चोरीचा आरोप केला. “1400 कोटी रुपयांची चोरी झाली आहे. ही चोरी कोणी केली? काँग्रेसने केली, आपने केली की जनता दलाने?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ही कथित चोरी दुसऱ्या कोणाकडून नव्हे, तर भाजपशी संबंधित संघटनांकडून झाल्याचा आरोपही जाधव यांनी केला. या विषयावर कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे सांगत देशातील अनेक ठिकाणी या मुद्द्यावर आवाज उठवण्यास सुरुवात झाल्याचा दावाही त्यांनी केला.

भास्कर जाधव यांनी केलेले हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असून प्रकरणातील आरोपांवर अंतिम न्यायालयीन निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

उद्धव ठाकरेंची ‘रामरक्षा’ आंदोलनाची हाक

यापूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर निशाणा साधला होता. राम मंदिराशी संबंधित कथित चोरीच्या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

“राम फक्त तुमचा नाही, राम सर्वांचा आहे. राम हिंदुस्थानातील तमाम हिंदूंचा आहे,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी संघटनांना ‘रामरक्षा’साठी सोबत येण्याचे आवाहन केले होते.

चौकशीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा स्वतंत्रपणे आणि निष्पक्ष तपास होण्याची मागणी केली. कथित चोरीच्या प्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

नागपुरातील संघभूमीतही आंदोलनाची भूमिका

उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा’ आंदोलनाची हाक दिल्यानंतर शिवसेना (उबाठा) या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाली आहे. नागपुरातील संघभूमीतही आंदोलन करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. त्यानंतर आता भास्कर जाधव यांनी हा विषय थेट गावागावात आणि मतदारसंघातील प्रत्येक भागात नेण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे राम मंदिराशी संबंधित कथित देणगी गैरव्यवहाराचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेबरोबरच महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षाचाही केंद्रबिंदू बनत असल्याचे दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागवला SIT चा अहवाल

दरम्यान, अयोध्या राम मंदिराच्या देणग्यांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर दाखल याचिकांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) तपासाच्या सद्यस्थितीचा अहवालही न्यायालयाने मागवला आहे. या अहवालात SIT च्या तपास अधिकाऱ्यांचा तपशील समाविष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

या न्यायालयीन घडामोडीनंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधातील राजकीय आक्रमकता वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा’ आंदोलनाच्या घोषणेनंतर आता भास्कर जाधव यांनीही हा मुद्दा जनतेपर्यंत नेण्याची भूमिका घेतल्याने आगामी काळात या विषयावर राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

 

Related to this topic: