MLA Abhimanyu Pawar: औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीवर आधारित, अभिमन्यू पवार यांनी केंद्र सरकारला स्वतंत्र कृषी संस्थान (KVK) स्थापनासाठी मंजूरी मागितली.
केंद्रीय कृषिमंत्र्यांची सकारात्मक भूमिका; अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा
औसा (MLA Abhimanyu Pawar) : औसा येथे स्वतंत्र कृषी विज्ञान केंद्र (KVK) स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून पाठवा, आम्ही मंजुरी देऊ, असा शब्द केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिला. दिल्ली येथे आमदार अभिमन्यू पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन औसा मतदारसंघातील विविध कृषीविषयक प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी हा शब्द दिला.
यापूर्वीही या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांची आमदार पवार (MLA Abhimanyu Pawar) यांनी भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या या भेटीत औसा व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधन, प्रशिक्षण आणि वैज्ञानिक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी औसा येथे स्वतंत्र कृषी विज्ञान केंद्राला लवकरात लवकर मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली. या मागणीवर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार पवार यांनी 'जी राम जी' (पूर्वीची मनरेगा) योजनेतील एका महत्त्वाच्या मुद्याकडेही केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. सध्या या योजनेत नवीन सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध असले, तरी जुन्या विहिरींचे खोलीकरण आणि गाळ उपसा करण्यासाठी कोणतेही अनुदान मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जुन्या विहिरींना अनुदान द्या!
अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या क्षेत्रावर शेती असूनही आर्थिक मर्यादांमुळे त्यांना नवीन विहीर घेणे किंवा जुन्या विहिरींचे खोलीकरण करणे शक्य होत नाही. परिणामी सिंचनाची क्षमता कमी होत असून शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या योजनेतून जुन्या विहिरींचे खोलीकरण व गाळ उपसा या कामांनाही अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी (MLA Abhimanyu Pawar) त्यांनी केली.