21 ऑगस्टला राज्यव्यापी उपक्रम, ना. संजय राठोड यांचे निमंत्रण स्वीकारले
पोहरादेवी येथील 'बंजारा विरासत' संग्रहालयालाही भेट देणार
मानोरा (Maha Walkathon 2026) : जलसंवर्धन आणि पर्यावरण जागृतीसाठी राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन 2026 - Walk for Water’ या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त (Sanjay Dutt) यांना निमंत्रित करण्यात आले होते.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिलेल्या निमंत्रणाचा संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी आनंदाने स्वीकार केला असून 21 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या या वॉकेथॉनमध्ये ते सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्यात पोहरादेवी येथील भव्य ‘बंजारा विरासत’ संग्रहालयाबाबतही सविस्तर चर्चा झाली. बंजारा समाजाचा समृद्ध इतिहास, संस्कृती, परंपरा आणि वारसा नव्या पिढीसमोर मांडणाऱ्या या संग्रहालयाला भेट देण्याचे निमंत्रणही ना. राठोड यांनी सुप्रसिद्ध अभिनेता दत्त यांना दिले, त्यावर संजय दत्त यांनी, “लवकरच पोहरादेवी येथे येऊन बंजारा विरासत संग्रहालयाला नक्की भेट देईन,” असे सांगितले.
'महा वॉकेथॉन हा (Maha Walkathon 2026) उपक्रम "माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा" या संदेशासह 21 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे. या उपक्रमातून जलसंधारणाचे महत्त्व जनजागृतीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. असे मंत्री ना. राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीने विचारले असता माहिती दिली.