Bori Bike seized: परभणीत बोरी पोलिसांनी आठ चोरीच्या मोटारसायकलांना ताब्यात घेतले. दोन आरोपींना सहाय्य करून यशस्वी कारवाई करण्यात आली. ३९५ हजार रुपयांचा माल जप्त
३ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक...!
जिंतूर (Bori Bike seized) : तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उल्लेखनीय कारवाई करत मोटारसायकल चोरीचे तब्बल ८ गुन्हे उघडकीस आणले असून ३ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींसह चोरीच्या आठ मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सपोनि. रामेश्वर धोंडगे व पोलीस कर्मचार्यांचे वरिष्ठानकडून कौतुक करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या सूचनेनुसार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आडगाव फाटा येथे सापळा रचला. यावेळी गजानन जनार्दन कोकाटे (वय २५) व बाळासाहेब रामकिशन शिंदे (वय २३, दोघेही रा. खानापूर फाटा, परभणी) यांना चार चोरीच्या मोटारसायकलींसह ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी आणखी चार चोरीच्या मोटारसायकल कमी किंमतीत विकल्याची कबुली दिली. त्यानंतर संबंधित चार रिसिव्हरचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातील चार मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या. एकूण आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत ३ लाख ९५ हजार रुपये आहे.
पोलिसांनी या घटनेत तपास केला असता आरोपींनी बोरी, जिंतूर, नवा मोंढा (परभणी), नानलपेठ (परभणी) तसेच नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. बोरी जवळील पिंपळगाव गायके व बोर्डी या गावात यातील काही गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अभिलेख पडताळणी केली असता परभणी जिल्ह्यातील बोरी, जिंतूर, नवा मोंढा, नानलपेठ आणि नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये संबंधित गुन्हे दाखल असल्याचे सुद्धा निष्पन्न झाले. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी पोलीस ठाण्याचे सपोनि. रामेश्वर धोंडगे, राजेश जटाळ, प्रताप साळवणे, अमोल मुंढे, संघसेन कांबळे आणि प्रकाश मोरे यांनी केली.
नांदेड व परभणी जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनला या गाड्या देण्यात येणार आहेत. यानंतर कागदपत्रांची प्रक्रिया करून गाडी मालकांच्या स्वाधीन करण्यात येतील. या घटनेचा अधिक तपास सुद्धा होईल, असे पोलीस ठाण्याचे सपोनि धोंडगे यांनी सांगितले.