पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत पडून मृत्यू झाल्याचे भासविण्यात आलेल्या केतन अग्रवाल प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत पडून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला भासविण्यात आलेल्या केतन अग्रवाल प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. प्रथमदर्शनी अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे पूर्वनियोजित खुनाचा कट असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हत्या केल्याचा आरोप असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी ट्रेकिंगसाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या केतन अग्रवाल यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला लोणावळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांमुळे पोलिसांना संशय आला आणि तपासाला वेगळी दिशा मिळाली.
४०० मीटर खोल दरीत ढकलल्याचा आरोप; त्यानंतर सुरू झाला 'ड्रामा'
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सियाने लोहगडावरील अत्यंत उंच आणि धोकादायक ठिकाणावरून केतनला सुमारे ४०० मीटर खोल दरीत ढकलल्याचा आरोप आहे. घटनेनंतर ती मोठ्याने "हेल्प... हेल्प..." अशी आरडाओरड करत असल्याचे घटनास्थळी उपस्थित सुरक्षा रक्षक दिनेश पवार यांनी सांगितले.
दिनेश पवार यांच्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा सुरक्षा कर्मचारी काही अंतरावर होते. अचानक ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर सर्वजण घटनास्थळाकडे धावले. तेथे सिया उपस्थित होती. ती मदतीसाठी आक्रोश करत होती आणि केतन मंदिराजवळ पडल्याचे सांगत होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला तेथेच थांबवून तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस चौकी अवघ्या २०० मीटर अंतरावर असून किल्ल्यावर २४ तास पोलिसांची ड्युटी असते, असेही त्यांनी सांगितले.
मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्कात अडचणी
दिनेश पवार यांनी सांगितले की, लोहगडावर अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने संपर्क साधण्यात अडचणी येतात. सिया वारंवार काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती; मात्र त्या वेळी सर्वांचे लक्ष केतनचा जीव वाचवण्यावर होते. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर शिवदुर्ग ट्रेकर्स यांनाही तातडीने माहिती देण्यात आली. ट्रेकर्सचे पथक दरीत उतरले, मात्र ते केतनपर्यंत पोहोचले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.
दिनेश पवार यांच्या म्हणण्यानुसार, दरीत मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे सुरुवातीला केतन जिवंत असण्याची आशा होती. मात्र तो डोक्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याला वाचवण्याची कोणतीही शक्यता उरली नव्हती.
धोकादायक आणि निर्जन ठिकाणाची निवड
ज्या ठिकाणाहून केतनला ढकलल्याचा आरोप आहे, तो लोहगडावरील शेवटचा आणि अत्यंत धोकादायक पॉइंट मानला जातो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे चारशे ते साडेचारशे पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्यानंतरही काही अंतर पायी ट्रेक करावा लागतो. संपूर्ण प्रवासाला जवळपास एक तास लागतो. या भागात पर्यटकांची वर्दळ कमी असल्याने घटना घडली तेव्हा तेथे इतर कोणीही नसल्याचे सांगितले जात आहे.
हुडी घातलेल्या तरुणामुळे वाढला संशय
किल्ल्यावरील तिकीट काउंटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना केतन आणि सिया यांचा पाठलाग करणारा एक संशयित तरुण दिसून आला. संबंधित व्यक्तीने शॉर्ट्स, हुडी, चेहऱ्यावर मास्क आणि कानावर मोठे हेडफोन घातले होते. विशेष म्हणजे, १८ जून रोजी परिसरातील तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस असतानाही त्याने हुडी परिधान केली होती. याच बाबीमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

एका फुटेजमध्ये सिया मागे वळून पाहताच हुडी घातलेला तरुण अचानक खाली बसल्याचे दिसून आले. दुसऱ्या ठिकाणी केतन थांबलेला असताना सिया त्या व्यक्तीला डोळ्यांनी आणि हातवाऱ्यांनी सांकेतिक इशारे करत असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तपास तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढे नेण्यात आला.
कॉल रेकॉर्डमधून उघड झाले प्रेमसंबंध
सिया गोयलच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि डिजिटल कम्युनिकेशनची तपासणी करताना तिचा एका व्यक्तीसोबत सातत्याने संपर्क असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पुढील तपासात तो व्यक्ती चेतन चौधरी असल्याचे स्पष्ट झाले.
तपासानुसार, सिया आणि चेतन यांची ओळख गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या सहा महिन्यांत तब्बल २ हजार फोन कॉल्स झाल्याचे तपासातून समोर आले असून, अनेक संभाषणे तासन्तास सुरू राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
साखरपुड्यानंतर आखला कट
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा साखरपुडा झाला होता, तर त्यांचा विवाह नोव्हेंबर २०२६ मध्ये होणार होता. मात्र, सिया चेतन चौधरीच्या प्रेमात होती. साखरपुडा मोडल्यास किंवा प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबीयांना दिल्यास बदनामी होईल, या भीतीतून तिने केतनला संपविण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे.

तांत्रिक पुराव्यांमुळे उलगडले रहस्य
चेतन चौधरीचे सोशल मीडिया प्रोफाइल आणि छायाचित्रांची तुलना सीसीटीव्हीमधील हुडी घातलेल्या व्यक्तीशी करण्यात आली. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गोळा केलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चेतनला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत मिळालेल्या माहितीनंतर सिया गोयललाही अटक करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केला. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेचा उलगडा सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल कम्युनिकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे करण्यात पोलिसांना यश आले.