Illegal Sand Mining Raid: नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रात १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आले. दोन बोटी, २० तराफे नष्ट करण्यात आले. कारवाईत ₹३० लाखचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळू उत्खनन
नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड (Illegal Sand Mining Raid) : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी ४ पहाटे १.३० वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन बोटी, २० तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजित किंमत ३० लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.
अचानक केलेल्या पाहणीत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा (Illegal Sand Mining Raid) सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ तहसीलदार संजय वारकड यांना माहिती दिली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली. यावेळी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कारवाईदरम्यान नदीच्या दुसऱ्या बाजूने हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर यांनाही सतर्क करण्यात आले. संयुक्त पथकाने दोन बोटी व २० तराफे नष्ट करून मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली.
दरम्यान, कारवाईनंतर परतत असताना शहर परिसरात अवैध वाळू (Illegal Sand Mining Raid) वाहतूक करणारी दोन वाहनेही पकडण्यात आली. ही वाहने पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या चार मजुरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या मोहिमेत तहसीलदार संजय वारकड, पोलीस निरीक्षक नांदेड ग्रामीण ओमकांत चिंचोलकर, केंद्रे, मठवाड पोलीस उपनिरीक्षक, श्रीकृष्ण येलमटे, सय्यद मोहसीन मंडळ अधिकारी, सर्व तलाठी माधव भिसे , सरपे ,मारुती श्रीरामे , वानोळे, डॉ.जोशी मारुती कदम, राजेश बरोडा, कोतवाल बालाजी सोनटक्के इत्यादींनी सदरील कारवाई केली आहे. पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उत्खनन (Illegal Sand Mining Raid) व वाहतुकीविरुद्ध प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला.