Hingoli Bike Theft: हिंगोली जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचा आदेश दिला. या मोहिमेतील पथकाने एका युवकाला अटक
हिंगोली (Hingoli Bike Theft) : हिंगोली जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेला मोठे यश आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 3 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
दिनांक 25 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सतिष लक्ष्मण पोटे रा. जलाल धाबा, ता. औंढा ना. हा युवक हिंगोली शहरात चोरीच्या मोटारसायकली विक्रीचा प्रयत्न करीत आहे. या (Hingoli Bike Theft) माहितीच्या आधारे पोलिसांनी कयाधु नदीच्या पुलाजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने हिंगोली शहरातील विविध ठिकाणांहून 3 मोटारसायकली चोरून त्या लपवून ठेवल्याची कबुली दिली.
आरोपीच्या ताब्यातून MH38-T6065 आणि MH38-S7009 क्रमांकाच्या दोन हिरो कंपनीच्या मोटारसायकली व एक विना क्रमांकाची हिरो स्प्लेंडर अशा एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या (Hingoli Bike Theft) कारवाईमुळे हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथील मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक माहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंटे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे व हरिभाऊ गुजंकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. जिल्ह्यातील चोरट्यांवर पोलिसांनी नजर ठेवली असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.