CNG Auto Accident: उदगीरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर सीएनजी ऑटो आणि स्विफ्ट डिझायर कारच्या धडकने सीएनजी टाकीचा स्फोट झाला. ऑटो जळून खाक झाला. चालकाने जीववाचवला, अपघातात जीवघेणी नुकसान टळली.
उदगीर (CNG Auto Accident) : उदगीर-जळकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर शनिवारी (7 जून) दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. नळगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर स्विफ्ट डिझायर कार (एमएच 26 व्ही 3760) आणि सीएनजी ऑटो (एमएच 12 वायएल 4181) यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर ऑटोमधील सीएनजी टाकीचा स्फोट होऊन ऑटोने क्षणार्धात पेट घेतला. काही मिनिटांतच ऑटो पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली.
माहितीनुसार, दोन्ही वाहने उदगीरकडे येत होती. नळगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी प्रचंड होती की, ऑटोमधील सीएनजी टाकीचा स्फोट झाला आणि आगीचे लोळ उसळले. काही क्षणांतच संपूर्ण (CNG Auto Accident) ऑटो ज्वालांच्या विळख्यात सापडला. घटनेवेळी ऑटोमध्ये चालक एकटाच होता. धडकेनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तात्काळ बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. अन्यथा ही दुर्घटना जीवघेणी ठरण्याची शक्यता होती. ऑटो आगीत भस्मसात होत असताना परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बातमी लिहीपर्यत वाढवणा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
"मृत्यू समोर दिसत असतानाही चालकाने वाचवला जीव"
धडकेनंतर सीएनजी टाकीचा झालेला स्फोट (CNG Auto Accident) आणि त्यानंतर लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकही हादरले. काही सेकंदांचा उशीर झाला असता तर ऑटो चालकाचा जीव धोक्यात आला असता. मात्र प्रसंगावधान राखत त्याने बाहेर पडल्याने मृत्यूच्या दाढेतून त्याचा चमत्कारिक बचाव झाला.