मानोरा (Manora Crop Damage) : तालुक्यातील मौजे चिस्तळा शिवारात पेरणी केलेल्या ३ शेतकऱ्यांच्या सहा एकर शेतीमधील सोयाबीन व तूर पिकांचे रान डुकरांच्या कळपाने नुकसान केले असुन पिकांची पाहणी व पंचनामा करून शासनाची नुकसान भरपाई द्यावी, असे तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदन दि. ९ जुलै रोजी नुकसानग्रस्त बाधीत शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे चिस्तळा शिवारातील शेतकरी पीयूष अरुण राठोड, शुभम अरुण राठोड यांच्या शेत सर्व्हे नंबर २१/१, २१/२ व सुयेश सुनील हनुमंते आणि शेत सर्व्हे नंबर २१/१ अ यांचे शेतात दि. ७ जुलै रोजी सोयाबीन आणि तूरची खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. शेतात पेरणी (Manora Crop Damage) केलेले पिकाची पाहणी करण्याकरिता दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास शेतात शेतकरी गेले असता रानडुक्कराने पेरलेले पूर्ण पिक उध्वस्त केले असल्याचे दिसून आले.
यामध्ये शेतकऱ्यांचे २ लक्ष ४५ हजाराचे नुकसान झाले असल्याने पंचनामा करून मोबदला देण्याची मागणी बाधीत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली असून. निवेदन देतेवेळी अरुण राठोड, हनुमंते व चव्हाण उपस्थित होते.