Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > शेती

पानकनेरगाव

दुष्काळाच्या झळांनी ‘पानकनेरगाव’ची ओळख पुसली

Panaknergaon: पानकनेरगाव” म्हणून ओळख असलेले हे गाव पानमळ्यांच्या भरभराटीमुळे  पानकनेरगाव हे गाव परिचित झाले


दुष्काळाच्या झळांनी ‘पानकनेरगाव’ची ओळख पुसली

Panaknergaon |

४०० पानमळ्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड

नागवेलीच्या हिरवाईतून ओसाड वास्तवाकडे गावाचा वेदनादायी प्रवास

पानकनेरगाव (Panaknergaon) : सेनगाव तालुक्यातील विदर्भ–मराठवाडा सीमेवर वसलेले पानकनेरगाव एकेकाळी नागवेलीच्या पानांच्या सुगंधाने दरवळणारे, शेकडो पानमळ्यांनी बहरलेले आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात नाव गाजवणारे हे गाव आज ओसाड वास्तवाशी झुंज देत आहे. पानकनेरगाव” म्हणून ओळख असलेले हे गाव पानमळ्यांच्या भरभराटीमुळे  पानकनेरगाव हे गाव परिचित झाले आणि पानमळ्यामुळे पानकनेरगाव (Panaknergaon) हे नावच पडले. पण आज त्याच पानमळ्यांचा लोप झाल्याने गावाची ओळखच धूसर झाली आहे. 

हिरवाईत न्हालेलं सुवर्णपान आता फक्त आठवण राहिले, एकेकाळी गावाच्या शिवारात ३०० ते ४०० पानमळे डोलत होते. नागवेलीच्या वेलींवर उमलणारी हिरवीगार पाने म्हणजे शेतकऱ्यांसाठी ‘हिरवं सोनं’ ठरत होती. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानपर्यंत येथील पानांची मोठी मागणी होती. धार्मिक विधी, पूजाअर्चा, समारंभ आणि जेवणाची सांगता, प्रत्येक ठिकाणी पानाला मानाचं स्थान असल्याने पानकनेरगावचा व्यापार तेजीत होता. (Panaknergaon) पानमळ्यांच्या तोडीचा दिवस गावासाठी सणासारखा असे. साखर वाटून आनंद साजरा केला जाई. त्या काळात पानमळ्यांनी अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य दिलं, वैभव दिलं आणि गावाला वेगळी ओळख मिळवून दिली.

मात्र, गेल्या दशकभरात निसर्गाने साथ सोडली. पावसाचे अनियमित प्रमाण, वर्षागणिक वाढणारा दुष्काळ, आटत चाललेली विहिरी-बोअर आणि कोरडे पडलेले तलाव यामुळे पानमळ्यांसाठी आवश्यक असलेले पाणीच उपलब्ध राहिले नाही. नागवेलीच्या लागवडीसाठी सातत्याने ओलावा आणि पाण्याची मुबलक गरज असते. तीच गरज अपुरी पडल्याने शेतकऱ्यांचे पानमळे एकामागून एक कोसळत गेले. ज्यांनी आयुष्य घालवून पानमळे उभे केले, त्याच शेतकऱ्यांनी अखेर विवश होऊन त्या मळ्यांवर नांगर फिरवला. आज स्थिती अशी आहे की, गावात एकही पानमळा शिल्लक राहिलेला नाही  हीच या गावाच्या बदलत्या वास्तवाची सर्वात मोठी आज शोकांतिका ठरली आहे.

पूर्वी एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे पानमळे आज टिकवणंही कठीण झालं. सततच्या पाणीटंचाईमुळे उत्पादन घटलं, तर खत, मजुरी आणि देखभालीचा खर्च वाढत गेला.
परिणामी, शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून इतर पिकांकडे वळण घेतलं. पण त्या पिकांत ना तेवढं उत्पन्न, ना पूर्वीसारखी समाधानाची भावना  असा अनुभव शेतकरी व्यक्त करतात.

लॉकडाऊनचा ‘अंतिम घाव’

दुष्काळाच्या जखमेवर कोरोनाच्या लॉकडाऊनने मीठ चोळल्यासारखं झालं. बाजारपेठा बंद, वाहतूक ठप्प आणि मजूर टंचाईमुळे तयार झालेली पानं मळ्यातच खराब झाली. ज्या पानांवर शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून होती, तीच पाने तोडून टाकावी लागली. ५० दिवसांत हजारो रुपयांचे नुकसान सहन करत शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेले. व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने आणि बाजारपेठ बंद झाल्याने (Panaknergaon) पानमळ्यांचा व्यापार अक्षरशः ठप्प झाला. आधीच अडचणीत असलेली ही शेती या दुहेरी संकटामुळे पूर्णपणे कोसळली.

परंपरेचा तुटलेला धागा

पानकनेरगावची (Panaknergaon) ओळख असलेले पानमळे आज इतिहासजमा झाले आहेत. एकेकाळी गावाच्या नावाशी घट्ट जोडलेली ही परंपरा आज तुटल्यासारखी वाटते.
गावातील ज्येष्ठ नागरिक आजही त्या दिवसांची आठवण काढतात, जेव्हा पानमळ्यांमुळे गावात उत्साह, रोजगार आणि समृद्धी होती.

उद्याच्या वाटेवर प्रश्नचिन्ह
आज पानकनेरगाव एका महत्त्वाच्या वळणावर उभं आहे. पाण्याचं शाश्वत नियोजन, सूक्ष्म सिंचन योजना, शासकीय अनुदान आणि बाजारपेठेची साखळी मजबूत केली, तरच या पारंपरिक पिकाला पुन्हा संजीवनी मिळू शकते. अन्यथा,पानमळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं पानकनेरगाव पुढील पिढ्यांसाठी फक्त इतिहासातील एक अध्याय ठरेल.

Related to this topic: