Fertilizers Sufficient Stock: जिल्ह्यात डीएपी व युरिया खताची कोणतीही कमतरता भासणार नाही, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (Fertilizers Sufficient Stock) : जिल्ह्यात डीएपी व युरिया खताची कोणतीही कमतरता भासणार नाही, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि कृषी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यासाठी मंजूर खत पुरवठा, (Fertilizers Sufficient Stock) उपलब्ध खतसाठा तसेच डिलरमार्फत होणाऱ्या खत वितरणाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात कोठेही डीएपी व युरिया खताची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करावे. तसेच अतिरिक्त खताची आवश्यकता असल्यास कृषी विभागाच्या सचिव व कृषी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून नियमित पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात विडंस प्रकल्पांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र स्थापन करण्याचे नियोजन असून, महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावर 30 हवामान केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय आणखी 10 हवामान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी जागेची उपलब्धता नाही, त्या संदर्भात प्रस्ताव सादर करून जागा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2025 अंतर्गत नुकसान भरपाई वाटपाचा आढावा घेण्यात आला. उर्वरित लाभार्थ्यांना भरपाईची रक्कम तात्काळ वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला.
शेतकऱ्यांनी 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांकडे हळद प्रक्रिया करण्यासाठी कुकर उपलब्ध आहेत, याची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ज्या (Fertilizers Sufficient Stock) शेतकऱ्यांना हळद प्रक्रियेसाठी आधुनिक साधनसामग्रीची आवश्यकता आहे, त्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 अंतर्गत लाभ उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले. या बैठकीत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त निधी तसेच आत्मा नियामक मंडळाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.