प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
संदीप बलवीर
टाकळघाट (Pandan Rasta Yojana) : शासनाने ग्रामीण भागातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत सुलभतेने पोहोचावा आणि शिवारातील दळणवळण सोपे व्हावे, यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा केली खरी, मात्र प्रत्यक्षात आंजनगाव आणि घोडेघाट येथील मुख्य पानंद रस्त्याची स्थिती पाहता या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दृष्टीपथास पडत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे येथील मुख्य पानंद रस्त्याला एखाद्या नदीचे किंवा दलदलीचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर जागोजागी साचलेल्या गुडघाभर चिखलातून बळीराजाला अत्यंत बिकट आणि जीवघेणी वाट काढावी लागत असल्याने 'मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजनेचा' पुरता फज्जा उडाला आहे.
योजना फक्त कागदावरच?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना पायाभूत सुविधा पुरवण्याच्या नावाखाली राज्य सरकारने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने १५ फूट रुंद व पक्के रस्ते तयार करण्यासाठी 'बळीराजा पानंद रस्ता योजना' जाहीर केली होती. मात्र, घोडेघाट आणि आंजनगाव परिसरातील शिवारांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अद्याप साधा मुरूमही टाकण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे पावसाळा सुरू होताच या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता दुरुस्तीचे दावे केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष बाब म्हणजे सध्या पेरणी आणि खत व्यवस्थापनाचा हंगाम जोमाने सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर किंवा साधे दुचाकी वाहन नेणेही अशक्य झाले आहे. डोक्यावर खतांची पोती घेऊन किंवा गुडघाभर चिखलात पाय रोवत महिला व पुरुष शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. अनेकदा पाय घसरून शेतकरी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तसेच, शेतातील भाजीपाला व इतर माल बाजारात वेळेवर नेता येत नसल्यामुळे उत्पादित मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, ज्यामुळे बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आंदोलनाचा इशारा
या संदर्भात घोडेघाट व आंजनगाव परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. "निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी रस्त्यांची आश्वासने देतात, मात्र प्रत्यक्षात आम्हाला दरवर्षी या नरकयातना सहन कराव्या लागतात," अशी संतप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाने या पानंद रस्त्याचे तातडीने सीमांकन करून खडीकरण व मजबुतीकरण करावे, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी व बळीराजाने दिला आहे.
पानंद रस्त्याचे सर्वेक्षण फक्त उन्हाळ्यात न करता पावसाळ्यात करण्यात यावे. कारण पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या अडचणीचे खरे चित्र दिसून येते. चिखल, पाणी आणि खराब रस्त्यांमुळे शेतात ये जा करने, दैनंदिन शेतीचे काम करने अत्यंत कठीण होत असतें.
- शुभम उडान, शेतकरी (माजी सरपंच व विद्यमान ग्रा प सदस्य, ग्रा प घोडेघाट)