बहारामपूरजवळील कर्णसुबर्णा रेल्वे फाटकावर सकाळी दुर्घटना; ५ जण गंभीर, ८ जण जखमी, पूर्व रेल्वेकडून चौकशी सुरू
पश्चिम बंगालमधील बहारामपूर परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला निमटिता-कटवा पॅसेंजर ट्रेनने जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून आठ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
ही दुर्घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास बहारामपूर परिसरातील कर्णसुबर्णा रेल्वे फाटकाजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल व्हॅन रेल्वे रुळ ओलांडत असताना निमटिता-कटवा पॅसेंजर ट्रेन वेगाने आली आणि व्हॅनला जोरदार धडक दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी कर्णसुबर्णा रेल्वे फाटक खुले होते. त्यामुळे स्कूल व्हॅनसह एक सायकलस्वारही रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी आलेल्या पॅसेंजर ट्रेनने व्हॅनला धडक दिल्याने वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर परिसरात मोठी धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Murshidabad, West Bengal: Three school students were killed and several others injured after a train collided with a school van at the Karnasubarna-Govindapur railway crossing on Friday morning. The train reportedly struck the van while it was crossing the tracks, leaving the… pic.twitter.com/O2lBYNOFow
— IANS (@ians_india) July 17, 2026
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून बहारामपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हावड्याकडे जाणारी नवद्वीप एक्सप्रेस गेल्यानंतरही गोबिंदपूर रेल्वे फाटक खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक वाहनांनी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा भीषण अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेत पूर्व रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी विशेष पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.