'नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' (NHSRCL) ने मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विविध तांत्रिक पदांवर भरती; पात्र उमेदवारांना ₹35,000 ते ₹1.10 लाख वेतन, CBT द्वारे होणार निवड
नवी दिल्ली : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असतानाच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाशी संबंधित 'नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' (NHSRCL) ने मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विविध तांत्रिक शाखांमधील एकूण 237 टेक्निशियन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांना 5 ऑगस्ट 2026 पर्यंत nhsrcl.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
या भरती मोहिमेत इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग अँड टेलिकॉम, सिव्हिल/ट्रॅक, रोलिंग स्टॉक तसेच इतर तांत्रिक विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि देखभाल व्यवस्थेसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
या भरतीमध्ये इलेक्ट्रिकल टेक्निशियनची 77 पदे, सिग्नलिंग आणि टेलिकॉम टेक्निशियनची 63 पदे, सिव्हिल/ट्रॅक फिटरची 18 पदे, सिव्हिल/ट्रॅक मेकॅनिकची 16 पदे, रोलिंग स्टॉक इलेक्ट्रिशियनची 13 पदे आणि रोलिंग स्टॉक फिटरची 10 पदे उपलब्ध आहेत. याशिवाय सिव्हिल/ट्रॅक ड्राफ्ट्समन, सर्व्हेयर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, प्लंबर, पेंटर, मशिनिस्ट, रोलिंग स्टॉक वेल्डर आणि RAC टेक्निशियन या पदांसाठीही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अर्जदारांनी मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक/SSLC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र, अथवा अप्रेंटिसशिप, किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
याशिवाय भारतीय रेल्वे, सरकारी मालकीची किंवा सरकारी संचालित रेल्वे, मेट्रो रेल किंवा प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) यांच्या ऑपरेशन्स आणि देखभाल विभागात किमान दोन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी वैध अनुभव अथवा क्षमता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. पात्रता आणि अनुभवाची गणना 30 जून 2026 या तारखेच्या आधारे केली जाईल.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
वेतन आणि नियुक्ती
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती NE-2 वेतनश्रेणी अंतर्गत Absorption Basis वर केली जाईल. त्यांना ₹35,000 ते ₹1,10,000 दरम्यान मासिक वेतन मिळणार आहे. नियुक्ती NHSRCL किंवा मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पांतर्गत कोणत्याही ठिकाणी केली जाऊ शकते. निवडीनंतर उमेदवारांना एक वर्षाचा परिविक्षा कालावधी (Probation Period) पूर्ण करावा लागेल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे:
- संगणक-आधारित परीक्षा (CBT)
- कागदपत्रांची पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
सर्व पदांसाठीची CBT परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळेत घेतली जाणार असून, परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.
अर्ज शुल्क
- General / OBC / EWS: ₹400
- SC / ST / महिला उमेदवार: अर्ज शुल्कातून पूर्ण सूट
अर्ज करण्यापूर्वी काय करावे?
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी NHSRCL च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि पात्रतेची खात्री करूनच ऑनलाइन अर्ज सादर करावा.