परभणी (Woman modesty Case ) : गंगाखेड येथील महीलेच्या विनयभंग प्रकरणी गंगाखेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोन वर्ष सश्रम कारावासासह दोन हजार रुपये दंड ठोठावत कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, १३ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील विवाहित महिला आईच्या घरून शेतात असलेल्या घरी जात असतांना रस्त्यात भेटलेल्या मोहन इंदर बुवा गिरी रा. खोकलेवाडी याने तुझ्या भावजयीला माहेरी का पाठविले असे विचारत वाईट उद्देशाने पिडीत महिलेचा हात धरून ओढत झटापट केली. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास करणारे तपास अधिकारी लक्ष्मण कांगणे यांनी गंगाखेड येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्र. २ यांनी उपरोक्त प्रकरणात आरोपी मोहन इंदर बुवा गिरी या आरोपीस कलम ३५४ (अ) (१) (i), ३५४ (अ) (१) (ii) भा.द.वि. प्रमाणे पिडीतेचा विनयभंग केल्याबद्दल दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
या शिक्षेविरुध्द आरोपी मोहन पि. इंदरबुवा गिरी रा. खोकलेवाडी, ता. गंगाखेड याने गंगाखेड येथील जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अपील दाखल केले असता दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुन जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदाळे यांनी जिल्हा सरकारी अभियोक्ता डी. यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. डी. वाकोडकर यांचा युक्तीवाद मान्य करुन कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे. त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. बी. पौळ, सरकार पक्षास मदतनीस म्हणून अड. संतोष संग्राम मुंढे यांनी व पिंपळदरी पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवीकार सपोउपनि जे.एच. पठाण, म.पो.शि. स्नेहल एस. जिंकलवाड, कोर्ट पैरवीकार एम.डी. कुंडगीर, मपोह श्रीमती एल.व्ही. मुंढे यांनी सहकार्य केले.