Officer Amol Ambhore: एक शेतकरी कुटुंबातून शिक्षण पूर्ण करून, शिक्षक म्हणून काम करत असतानाच अमोल अंभोरे यांनी MPSC परीक्षेत यश मिळवून सहाय्यक आयुक्त पदावर निवडून मानाचा तुरा
शिक्षक ते सहाय्यक आयुक्त': संघर्ष, जिद्द आणि परिश्रमाची प्रेरणादायी यशोगाथा
हिंगोली (Officer Amol Ambhore) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अत्यंत स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित परीक्षेत यश मिळवत अमोल डिगाबंर अंभोरे (Officer Amol Ambhore) यांनी सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी (वर्ग-१) या पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेत, शिक्षक म्हणून नोकरी,कुटुंब सांभाळत आणि अनेक अडचणींवर मात करत मिळवलेले हे यश आज हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या यशामुळे गाव सावंगी भु ता. कळमनुरी आणि हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमोल अंभोरे यांचा जन्म एका सामान्य आणि कष्टकरी कुटुंबात झाला. वडील आणि आई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. आर्थिक मर्यादा, ग्रामीण भागातील विविध अडचणी असूनही शिक्षणाची आवड कायम ठेवत त्यांनी यशाचा मार्ग निवडला.
लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना विशेष आस्था होती. समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना काका डॉ. प्रकाश अंभोरे, मुख्याध्यापक -भारतीय विद्या मंदिर, हिंगोली यांच्या कडून मिळाली. याच प्रेरणेतून त्यांनी भविष्यात प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांसाठी काम करण्याचे स्वप्न पाहिले.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सावंगी येथे पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षण गुंडेवार विद्यालय, सालेगाव येथे झाले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण नोकरी करत पूर्ण केले.
त्यांनी (Officer Amol Ambhore) D.Ed., M.A. (English &Pol. sci.),M.S.W.,SET या पदव्या संपादन केल्या.नोकरी करत असतानाच सामाजिक विषय, प्रशासन, संविधान, समाजकल्याण योजना आणि शासन व्यवस्थेचा अभ्यास करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. त्यातूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. १३वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असताना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू ठेवला. दिवसभर शाळेतील अध्यापन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक कर्तव्ये सांभाळून उर्वरित वेळ ते अभ्यासासाठी देत होते.
सकाळी लवकर उठून, रात्री जागून अभ्यास करणे, शाळेनंतर नियमित वाचन, चालू घडामोडींचा अभ्यास, यामुळे त्यांचा अभ्यास अधिक भक्कम होत गेला. मर्यादित साधने असूनही त्यांनी स्वतःच्या जिद्दीच्या बळावर तयारी केली.स्पर्धा परीक्षेचा प्रवास हा संयमाची परीक्षा पाहणारा असतो. अनेक वेळा अपेक्षित निकाल मिळाला नाही, 4 मुख्य व दोन मुलाखती दिल्यानंतर हे यश आले; मात्र त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक अपयशातून चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न केला.
“अपयश हे यशाची पहिली पायरी असते” या विचारावर विश्वास ठेवत त्यांनी अभ्यासात सातत्य कायम ठेवले. कुटुंबाचे प्रोत्साहन, गुरुजनांचे मार्गदर्शन , पत्नी पुष्पांजली ची भक्कम साथ मिळाली. यामुळे त्यांनी आपले ध्येय साध्य केले.निकाल जाहीर होताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. निवडीनंतर बोलताना त्यांनी (Officer Amol Ambhore) सांगितले की, समाजातील दुर्बल, वंचित, दिव्यांग, महिला, बालक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे. प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यशाबद्दल प्रतिक्रिया देताना ते (Officer Amol Ambhore) म्हणाले की, “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य, शिस्त, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतः वरील विश्वासामुळे यश नक्की मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. त्यांच्या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविणारा एक शिक्षक आज प्रशासकीय सेवेत प्रवेश करून समाज घडविण्याच्या मोठ्या जबाबदारीकडे वाटचाल करत आहे. त्यांची ही यशोगाथा निश्चितच असंख्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.