Nanded People's College: परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेले नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड हे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण
नांदेड (Nanded People's College) : परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेले नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड हे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, मूल्याधिष्ठित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या ध्येयाने सातत्याने कार्यरत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विकास सुकाळे यांनी केले.
इयत्ता अकरावीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ अभिभाषणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाच्या समृद्ध शैक्षणिक परंपरेची माहिती दिली. ते म्हणाले की, पीपल्स कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कला व वाणिज्य शाखेतील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक शैक्षणिक वातावरण, भव्य क्रीडांगण, मराठवाड्यातील समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विविध सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थी विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या सुविधांचा पुरेपूर लाभ घेत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात, कौशल्यात आणि व्यक्तिमत्त्वात सातत्याने भर घालावी. शैक्षणिक प्रगतीसोबतच आपल्या आवडी-निवडी, छंद आणि कलागुण जोपासून करिअरच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. विशाल पतंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठे ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने परिश्रम घेतले पाहिजेत. ग्रामीण भागातून आलो आहोत, ही न्यूनगंडाची भावना मनातून पूर्णपणे दूर करून महाविद्यालयात उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घ्यावा. सांस्कृतिक, कला, क्रीडा, निबंध, वक्तृत्व, वाद-विवाद आदी विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते. कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. पीपल्स कॉलेज परिवारात सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. विकास सुकाळे, उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे व कार्यकारिणी सदस्य प्रा. विलास वडजे यांच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ.विनायक देव, प्रा. जी. डी. ताडोड, डॉ. माया भालेराव, डॉ. विनोद चव्हाण, प्रा. किरण बिचकुंदे, प्रा. आदित्य गोडबोले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. विजयानंद कदम यांनी केले, तर डॉ. आम्रपाली कसबे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या स्वागत समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन जीवनाबाबत आत्मविश्वास, सकारात्मकता आणि नवीन उमेदीची भावना निर्माण झाली.