कळमनुरी (Kalamnuri Municipal Council) : कळमनुरी शहरातील वाढती घाण, अनियमित पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहरातील नागरिकांच्या वतीने 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद कार्यालयासमोर "ढोल बजाओ आंदोलन" आयोजित करण्यात आले आहे.
शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छता अभियान त्वरित सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. याशिवाय शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. मुख्य मार्गांसह शहरभरातील बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत आणि दररोज घंटा गाडी अर्थात कचरा गाडीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.
नुरी बाबा कमान, महात्मा फुले शाळा आणि रजा-ए-नुरी उर्दू शाळा या परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही यावेळी केली जाणार आहे.
नगर परिषदेच्या (Kalamnuri Municipal Council) भोंगळ कारभारामुळे स्व. बाळासाहेब उद्यान आणि तिरुपती नगर येथील उद्यान बंद अवस्थेत आहे. ही दोन्ही उद्याने पुन्हा सुरू करावीत अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. यासोबतच मदिना मश्जीद परिसर, जुने पोलीस स्टेशन रोड, भाजी मंडी परिसर आणि शहरातील नाल्यांची पूर्णपणे स्वच्छता करण्यात यावी अशी मागणीही आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.
समस्त कळमनुरी शहरातील नागरिकांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असून प्रशासनाने तातडीने मागण्यांची दखल घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.