६० कामगारांच्या टेंडरमध्ये प्रत्यक्ष २४-२५ जणच हजर असल्याचा आरोप; कचरा उचलण्याची मागणी
कळमनुरी (Kalamnuri Municipal Safai Tender) : शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेने दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचे सफाई टेंडर काढले असतानाही शहरातील अस्वच्छता कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. टेंडरनुसार ६० सफाई कामगार अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २४ ते २५ कामगारच कामावर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद बांगर यांनी केला आहे.
नाल्यांची सफाई केल्यानंतर कचरा (Kalamnuri Municipal Safai Tender) वेळेवर उचलला जात नसल्याने तो रस्त्यांच्या कडेला साचत आहे. तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासह माळीगल्ली परिसरात २ ऑक्टोबर रोजी कचऱ्याचे ढीग दिसून आले.
टेंडरमध्ये कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया तसेच घंटागाड्यांद्वारे ओला-सुका कचरा संकलनाचा समावेश आहे. त्यामुळे कामगारांची प्रत्यक्ष उपस्थिती, हजेरीपत्रक व वेतन देयकांची चौकशी करावी, अशी मागणी बांगर यांनी केली आहे. नवरात्रोत्सवापूर्वी शहराची स्वच्छता युद्धपातळीवर करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.