औंढा नागनाथ (Illegal sand smuggling) : तालुक्यातून वाहणार्या पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करणार्या दोन ट्रॅक्टर वाहनावर औंढा नागनाथ पोलिसांनी गुप्त माहितीवरून १२ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बेरुळा शिवारात तसेच येळी शिवारात सापळा रचून अवैध वाळूची दोन ट्रॅक्टर वाहन पकडून औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे आणून लावण्यात आली या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील बेरूळा, नांदखेडा, शिवारातून वाहणार्या पूर्णा नदीपात्रातून वाहनाद्वारे अवैध वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांना मिळाली होती. यानंतर पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, पोलीस जमादार रविकांत हरकळ, शाहेद सय्यद, राजकुमार कुटे, किशोर पारस्कर, अमोल चव्हाण सह पोलिसांनी सापळा रचून पूर्णा नदीतून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करत असताना एक ट्रॅक्टर वाहन नांदखेडा ते बेरुळा रोडवर बेरूळा शिवारात पकडण्यात आले.
यानंतर दुसरे ट्रॅक्टर चिंचोली ते येळी फाटा रोडवर येळी शिवारात पकडले सदरील दोन्ही विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन त्यामधील वाळू जप्त करून औंढा ना. पोलीस ठाणे येथे आणून लावण्यात आले तसेच दोन्ही ट्रॅक्टर चालक ताब्यात घेण्यात आले यामध्ये एक ट्रॅक्टर हेड व ट्रॉली तसेच त्यामधील एक ब्रास वाळू ज्याची किंमत ८ लाख ५ हजार, तसेच दुसरा ट्रॅक्टर हेड ट्रॉली तसेच त्यामधील वाळू ज्याची किंमत ८ लाख ५ हजार रुपये असा एकूण १६ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एका फिर्यादीत पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले यांच्या फिर्यादीवरून वैभव लक्ष्मण पडघान रा. पोटा खुर्द यांच्यावर तर दुसर्या कारवाईतील फिर्यादी जमादार रविकांत हारकळ यांच्या फिर्यादीवरून किरण दत्तराव आव्हाड रा. पेरजाबाद याच्यावर १२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणार्याचे धाबे दणाणले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविकांत हरकाळ हे करत आहेत.
अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पथकानेही पकडले अवैध रेतीचे ट्रॅक्टर
अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या कार्यालयातील पथकाने ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० सुमारास बोरी सावंत फाट्यावर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३८ डी ९३२४ यामधून अवैधरित्या रेती विना रॉयल्टी चोरून वाहतुक करीत असताना मिळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना विचारणा केला परंतु कोणताही परवाना मिळून आला नसल्याने ५ लाख रुपयाचे ट्रॅक्टर हेड व १ लाख ५५ हजार रुपयाची ट्रॉली, ५ हजार रुपयाची एक ब्रास रेती असा एकुण ६ लाख ५५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हट्टा पोलिस ठाण्यात पथकातील जगन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक साईराम शिवाजी कदम रा. करंजाळा ता.वसमत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास चव्हाण हे करीत आहेत.