विशेष पोलिस पथक, स्थागुशाची कारवाई दोघाविरुध्द गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Gutkha Action) : पूर्णा तालुक्यातील खडाळा गावाच्या अलीकडे पांदण रस्त्यावर पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत चारचाकी वाहनासह तब्बल ६ लाख ७९ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खडाळा गावाच्या अलीकडे पांदण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक अंजय्या मुदिराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पद्माकर ऊर्फ बाळू गोविंदराव शिंदे (रा. खडाळा, ता. पूर्णा) आणि शे. असलम शे. गौस (रा. पूर्णा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी केसरयुक्त विमल पान मसाला, राजनिवास, जाफरानी जर्दा असा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि महिंद्रा कंपनीची नंबर नसलेली सिल्व्हर रंगाची जुनी वापरती कार असा एकूण किंमत ६ लाख ७९ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.
ही (Parbhani Gutkha Action) कारवाई एपीआय जायभाये, पोहेकाँ रवी जाधव, पोहेकाँ दिपक मुदिराज, पोहेकॉ यशवंत वाघमारे, पोकॉ शरद सावंत, पोकॉ धोत्रे यांनी यशस्वी पार पाडली. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७४, २७५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.