हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीतील छाप्यात एकास पकडले; स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन कारसह गुटखा जप्त, विक्रेते पसार
हिंगोली : शहरासह परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी शुक्रवारी छापे मारण्यात आले. यामध्ये हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील खटकाळी बायपास येथे एका स्कार्पिओ वाहनासह १७ लाख ९० हजार ५३० रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करून एकास पकडण्यात आले. तर हिंगोली शहरातील तोफखाना भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात दोन कारसह गुटखा असा एकूण १६ लाख ७ हजार ३०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, गुटखा विक्रेत्यांनी पोलिसांना पाहून पलायन केले.
हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापे मारण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत. एका स्कार्पिओ वाहनातून गुटखा विदर्भाकडे नेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.
त्यानुसार १९ सप्टेंबर रोजी हिंगोली ते कळमनुरी रस्त्यावरील खटकाळी बायपास येथे पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार स्कार्पिओ वाहन क्रमांक एमएच २६ झेड ५००५ येताच पोलिसांनी वाहन अडवून चालकाकडे वाहनातील मालाबाबत विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला.
सदर वाहन हिंगोली ग्रामीण ठाण्यात आणल्यानंतर तपासणी केली असता त्यामध्ये १२ पिशव्यांमध्ये ६ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा केसरयुक्त विमल पानमसाला, ९९ हजार ३६० रुपयांचा २३ बॉक्समधील रजनीगंधा पानमसाला, २१ हजार ६०० रुपयांचा ५४ पाऊचमधील व्ही-१ तंबाखू आणि १६ हजार १७० रुपयांचे २१ पाऊचमधील व्ही-१ विंग तंबाखू असा ७ लाख ९० हजार ५३० रुपयांचा गुटखा मिळून आला.
तसेच १० लाख रुपये किमतीचे स्कार्पिओ वाहन असा एकूण १७ लाख ९० हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीतकर, बापूराव चव्हाण, विष्णू चव्हाण, सुधीर ढेंबरे, शंकर गायकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने सहभाग घेतला.
या प्रकरणात हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी राजश्री सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक शेख लईख शेख अहमद, रा. बिलाल नगर, इतवारा, नांदेड आणि अनवर उर्फ हाजी हुसैन सय्यद, रा. तोफखाना, हिंगोली या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेख लईख याची चौकशी केली असता, अनवर उर्फ हाजी हुसैन सय्यद याच्या सांगण्यावरून शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक केल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णुकांत गुठ्ठे करीत आहेत.
तोफखाना भागात दोन कारसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
त्याचप्रमाणे १९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली शहरातील तोफखाना भागातील शकुर कच्ची यांच्या घराजवळ छापा मारला. यामध्ये इनोव्हा कार क्रमांक एमएच ०४ एफएफ २२७४ आणि हुंडई कार क्रमांक एमएच ०३ एआर ९७३५ या दोन वाहनांमध्ये गुटखा व तंबाखू आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४८ हजार ३१२ रुपयांचे विमल पानमसाल्याचे २४४ पुडे, ५ हजार ३६८ रुपयांचे व्ही-१ तंबाखूचे २४४ पुडे, १ लाख ८० हजार रुपयांचे १२ बॉक्समधील राजश्री परंपरा (वाणी) सुगंधित तंबाखूचे २०० पुडे, ४८ हजार ३१२ रुपयांचे विमलचे पुडे, ५ हजार ३६८ रुपयांचे तंबाखूचे २४४ पुडे आणि १ लाख २० हजार रुपयांचे ८ बॉक्समधील राजश्री परंपरा (वाणी) सुगंधित तंबाखूचे २०० पुडे असा ४ लाख ७ हजार ३०७ रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला.
तसेच ८ लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा आणि ४ लाख रुपये किमतीची हुंडई कार असा एकूण १६ लाख ७ हजार ३०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात गुन्हे शाखेचे नरेंद्र साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकरम बेग इस्लामबेग आणि अनवर उर्फ हाजी हुसैन सय्यद, रा. हिंगोली, या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के करीत आहेत.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार, पोलिस अमलदार गजानन पोकळे, पांडुरंग राठोड, लिंबाजी वाव्हुळे, निरंजन नलवार, सतीश जाधव, नरेंद्र साळवे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
संशयाची किनार : मुद्देमालासह वाहने मिळतात, आरोपींचे पलायन
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर करडी नजर असून, त्याचा एक नमुना हिंगोलीत त्यांनी दाखवून दिला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनाही अनेक खबऱ्यांमार्फत अवैध धंद्यांची माहिती मिळत असताना पोलिस पथकांना रवाना करून कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये आरोपींसह मुद्देमालही जप्त केला जातो.
मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोलीत कारची काच फोडून पैसे लंपास करणारी आंतरराज्य टोळी उघड केली होती. यामध्ये मध्य प्रदेशातील चार आरोपी निष्पन्न करण्यात आले. गुन्ह्यातील २ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम पथकाने जप्त केली. मात्र, गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत, ही बाब संशयास्पद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
तसेच १९ सप्टेंबर रोजी पहाटे हिंगोलीत याच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन कारसह गुटखा व तंबाखू असा एकूण १६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, पोलिसांना पाहून आरोपींनी पलायन केले. प्रत्येकवेळी मुद्देमाल जप्त होतो, परंतु आरोपींचे पलायन होते, ही बाब नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.