हिंगोली फटाका स्फोट

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion

 

दोन्ही मृतदेहांची ओळख पटली 
हिंगोली शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
शवविच्छे दनानंतर दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार 

हिंगोली (Hingoli Firecracker Explosion) : शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते. या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत १२ जण जखमी झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागातील विजय बासटवार यांच्या निवासस्थानाला ५ ऑक्टोंबर सोमवार रोजी रात्री ७.४० च्या सुमारास आग लागली. या निवासस्थाना मध्ये फटाक्यांचे गोदाम व कृषि केंद्रातील साहित्य साठवणूक करण्यात आले होते. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने हिंगोली नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. या दलातील कर्मचार्‍यांनी फटाक्याचे गोदाम उघडताच आगीचा लोळ त्यांच्यावर आल्याने नगर पालिकेचे अग्निशमन वाहन व रवि कांबळे, दिलीप दोडके व आकाश सांगळे हे तीन कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर अग्निशमन दलाचे मोठे वाहन आणि खासगी टँकरला घटनास्थळी पाचारण केल्यानंतर आगीवर पाण्याचा मारा केला जात होता. ही आग विझवित असताना आमदार संतोष बांगर यांना दोन मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आले. केवळ मृतदेहाचा सांगाडाच दिसून येताच त्यांनी तात्काळ रूग्णवाहीकेतून हे दोन्ही मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केले.

अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत विजय बासटवार, शैलेश नांदेडकर या दोघांचे घर भस्मसात झाले. यासोबतच आजूबाजूला असलेल्या नागरीकांच्याही घराला आगीचा फटका बसला. दोन अनोळखी मृतदेहाची ओळख मंगळवारी पटली. ज्यामध्ये विजयकुमार रामकृष्ण बासटवार व आग विझविण्याकरीता आलेला अविनाश काशिनाथ बांगर (२६) या दोघांची ओळख पटली. सायंकाळी ४ वाजता दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याचवेळी पोलिसांनी दोघांच्याही मृतदेहाचे डिएनएससाठी नमुने ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेहांवर सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

 या आगीमध्ये श्रावणी राजगोपाल बासटवार, राजगोपाल विजयकुमार बासटवार, नगरसेवक कपिल जुगलकिशोर खंडेलवाल, अश्व शंभूलाल चौधरी, भरत चौधरी पहेलवान, कृष्णा बजरंग अग्रवाल, सुशिल मुरलिधर बांगर, अनुप भगिरथ अग्रवाल, अमिष चौधरी यासोबतच हिंगोली नगर पालिका अग्निशमन दलाचे रवि कांबळे, दिलीप दोडके व आकाश सांगळे हे १२ जण जखमी झाले. या जखमींवर हिंगोलीतील जिल्हा शासकीय रूग्णालय, लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, डॉ. राम मुंढे यांचे शिवम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आला. यातील काही गंभीर जखमींना छत्रपती संभाजी नगर व लातूर रूग्णालयात हलविण्यात आले.

या (Hingoli Firecracker Explosion) आगीमध्ये तीन वाहने जळून खाक झाली. आगीत जळपास १ कोटी रूपयापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे भरवस्तीमध्ये असलेल्या गोदामातील फटाक्यांच्या साठवणीबाबत कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता. विजय बासटवार हे बर्‍याच वर्षापासून फटाक्यांचा व्यवसाय करीत होते. कायम परवाना देण्याचा अधिकार शासनाला असल्याने याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती महसुल व नगरपालिका प्रशासनाला नव्हती.  मंगळवारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी सतिष वाघ  यांच्यासह पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी भेट दिली. 

या (Hingoli Firecracker Explosion) प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात नरेश जगन्नाथ बासटवार यांनी दिलेल्या माहितीवरून मारवाडी गल्लीत बासटवार यांच्या घराला लागलेल्या आगीत विजयकुमार बासटवार व आग विझविण्यास आलेला अविनाश बांगर या दोघांचा जळून मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे हे करीत आहेत.