औसा तालुक्यातील शेतकऱ्याने दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या
वानवडा गावावर शोककळा...
औसा (Drought Affected farmer Suicide) : दरवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती, शेतातील पिकांचे झालेले नुकसान आणि यामुळे निर्माण झालेल्या तीव्र आर्थिक विवंचनेला कंटाळून एका ४४ वर्षीय शेतकरी तथा शेतमजुराने मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्वसंध्येला आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना औसा तालुक्यातील वानवडा गावामध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय मारुती कदम (वय ४४ वर्षे, रा. वानवडा, ता. औसा) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दत्तात्रय मारुती कदम हे शेती आणि मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतातील पीक पूर्णपणे वाळल्यांने, हाताशी आलेले खरीप पीक करपून गेल्याचे पाहून आणि दुष्काळी परिस्थितीमुळे पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेतून ते अत्यंत नैराश्यात गेले होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
घटनेची माहिती मिळताच औसा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) बेलकुंड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या (Drought Affected farmer Suicide) घटनेचा पुढील तपास औसा ग्रामीण पोलीस करत आहेत.
मयत दत्तात्रय कदम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. (Drought Affected farmer Suicide) घरातील कुटुंब प्रमुख पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वानवडा सह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.