Branded Goods Fraud: नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने विक्रीसाठी साठवून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उदगीर (Branded Goods Fraud) : नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने विक्रीसाठी साठवून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत क्रॉम्प्टन, हॅवेल्स, टिबकॉन व रॉयल बटरफ्लाय या कंपन्यांच्या नावाने बनावट असल्याचा संशय असलेला २१ हजार २२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी (Branded Goods Fraud) अक्षय अशोक पंजारे (वय ३५ वर्षे), व्यवसाय – आयपी इन्व्हेस्टिगेशन सर्व्हिस अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिस प्रा. लि., मुंबई, रा. साईनाथनगर, एस. व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुरनं. ३२८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८ (४), ३ (५) तसेच प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (सुधारित १९८४ व १९९४) मधील कलम ५१, ५२, ६३, ६५ आणि व्यापार चिन्ह अधिनियम १९९९ मधील कलम १०३ व १०४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
शेख उमर शेख मस्तान (वय ३९, रा. हबीबिया कॉलनी, देगलूर नाका, इतवारा, नांदेड) वकील अहमद (रा. दिल्ली), संदीप शर्मा (रा. मेन गुरुद्वारा रोड, कार मार्केट, दिलशाद गार्डन, दिल्ली), प्रिन्स चौधरी (रा. महाराम मोहल्ला, सधारा, दिल्ली), अभिमन्यू (पूर्ण नाव माहित नाही, रा. विश्वास नगर, सधारा, दिल्ली), आदीश जैन (रा. गल्ली क्र., मूर्तीवाली गल्ली, लिबासपूर, दिल्ली),जयंत (पूर्ण नाव माहित नाही, रा. क्र. २३९, रेतीया बाजार, वृंदावन, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) दि. २६ जुलै २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास चौबारा रोडवरील टॉप इलेक्ट्रिकल्स समोर पोलिसांनी कारवाई करून बनावट उत्पादनांचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये क्रॉम्प्टन कंपनीचे वायरचे ५ बॉक्स (९ हजार ३०० रुपये), हॅवेल्स कंपनीचे ६० कॅपेसिटर (३ हजार रुपये), टिबकॉन कंपनीचे ८५ कॅपेसिटर (१ हजार ८७० रुपये) तसेच रॉयल बटरफ्लाय कंपनीच्या ३ गॅस शेगड्या (७ हजार ५० रुपये) असा एकूण २१ हजार २२० रुपयांचा माल आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादने तयार करून अथवा विविध ठिकाणांहून मागवून ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ती विक्रीसाठी ताब्यात ठेवली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.