World Environment Day: चिखली नगर परिषदेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. पर्यावरण अभ्यासक अंकुशराव पडघान पाटील यांनी वृक्षारोपण व संवर्धनासाठी व्यापक लोकसहभाग
चिखली (World Environment Day) : जागतिक तापमानवाढ, एल निनो-ला नीना, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर आणि जंगलातील आगी यांसारखी संकटे जगासमोर उभी ठाकली असून, या संकटांवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन हा सर्वात प्रभावी पर्याय असल्याचे प्रतिपादन पर्यावरणीय अभ्यासक अंकुशराव पडघान पाटील यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी चिखली-खंडाळा रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरात चिखली नगर परिषदेच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, चिखली अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक सतीशजी गुप्ता, उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर, कपिल खेडेकर, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, सुरेंद्र प्रसाद पांडे, सुधीर तांबट, युवराज भुसारी, नगरसेवक अमोल खबूतरे, गुरुदत्त सुसर, राणा सुरेंद्रसिंग ठाकूर, मोहित व्यवहारे, ज्योतीताई वाळेकर, प्रियाताई बनसोडे, अश्विनीताई जाधव, डॉ. मोहम्मद इसरार, डॉ. अमोल लहाने, डॉ. प्रकाश शिंगणे, रत्नदीप शिंगारे, गोकुळ शिंगणे, प्रा. पुरुषोत्तम वायाळ, प्रशांत भटकर, महेश लोणकर, कमलकिशोर लांडगे, शाहीर बापू लंबे, हरिभाऊ परिहार, सचिन कोकाटे, बाबू भुतेकर, भारत पवार, नरेंद्र मोरवाल, बाळू जाधव, अॅड. संजीव सदार, जावेद बागवान, नज्जू साहेब, सिद्धेश्वर ठेंग, दासाभाऊ बनसोडे, कैलास खराडे, श्याम वाकदकर यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अंकुशराव पडघान पाटील म्हणाले की, (World Environment Day) जगभरात हवामान बदलाचे परिणाम दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. विदर्भासह पश्चिम विदर्भातील भागात यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाली असून उष्णतेच्या लाटांचा मानवी आरोग्य, शेती आणि जलस्रोतांवर विपरीत परिणाम होत आहे. तापमानवाढीमुळे एल निनो आणि ला नीना यांसारख्या हवामान चक्रांची तीव्रता वाढत असून त्यातून दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, पाणीटंचाई आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत आहे.
समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे चक्रीवादळे अधिक शक्तिशाली होत आहेत, हिमनद्या वेगाने वितळत असून समुद्रपातळी वाढत आहे. उष्ण व कोरड्या हवामानामुळे जंगलातील आगींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वृक्षारोपण, जंगल संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी व्यापक लोकसहभागाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चिखली अर्बन बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी वृक्षारोपणासोबतच प्लास्टिकमुक्तीचा संकल्प करण्याचे आवाहन केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात नगराध्यक्ष पंडितराव देशमुख म्हणाले की, वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्राणवायू निर्माण करतात. तसेच पावसाचे प्रमाण संतुलित ठेवणे, भूजल पातळी वाढवणे, मृदाक्षरण रोखणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे यासाठी वृक्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत.
ते पुढे म्हणाले की, वृक्ष लागवड व संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यास जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, पाणीटंचाई, अतिवृष्टी, पूर, प्रदूषण, श्वसनाचे आजार आणि शेतीचे नुकसान यांसारख्या समस्या अधिक गंभीर होतील. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने केवळ वृक्ष लावणे नव्हे तर त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. "एक झाड लावा, अनेक पिढ्यांचे जीवन वाचवा" हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम वाकदकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्यासह नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (World Environment Day) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या या वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती व संवर्धन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी वृक्षारोपण व हरितीकरण, प्लास्टिकमुक्त अभियान, पर्यावरण शिक्षण व जनजागृती, स्वच्छता व आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, पाणी संवर्धन आणि ऊर्जा संवर्धन या विषयांवर सामूहिक शपथ घेतली. पर्यावरण रक्षणासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. (World Environment Day) पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला. नगर परिषदेच्या या हरित उपक्रमामुळे शहर परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.