Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

SOYABEAN INV-108

पाडशिंगीत ‘SOYABEAN INV-108’ बियाणे बोगस निघाल्याचा संशय; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शेतकरी भिका लालसिंग पवार आणि इतर शेतकरी बांधवांनी शेतात पेरलेले ‘SOYABEAN INV-108’ या नावाचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याचा संशय व्यक्त केला आहे.


पाडशिंगीत ‘soyabean inv-108’ बियाणे बोगस निघाल्याचा संशय शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

आलेगाव येथील कृषी केंद्रातून बियाणे खरेदी; 48 तासांत भरपाई न मिळाल्यास पातूर कृषी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पातूर : तालुक्यातील पाडशिंगी येथील शेतकरी भिका लालसिंग पवार आणि इतर शेतकरी बांधवांनी शेतात पेरलेले ‘SOYABEAN INV-108’ या नावाचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याचा संशय व्यक्त केला आहे. बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबत समस्या किंवा दोष आढळल्याने संबंधित शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या प्रकरणात संबंधित कंपनी आणि विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वाखाली पातूर कृषी विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

आलेगाव येथील कृषी केंद्रातून बियाण्याची खरेदी

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित शेतकऱ्यांनी संबंधित सोयाबीन बियाणे आलेगाव येथील एका नामांकित कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते. मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, त्यानंतर बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबत समस्या किंवा दोष आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीसाठी झालेला खर्च आणि मेहनत वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी विभागाकडे पाच प्रमुख मागण्या

निवेदनाद्वारे कृषी विभागाने संबंधित शेताची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अधिकृत पंचनामा करावा, बियाण्याचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित बियाण्याच्या विक्रीवर बाजारात प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, संबंधित कंपनीने 48 तासांच्या आत प्रभावित शेतकऱ्यांना नवीन दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे किंवा नुकसानभरपाई द्यावी. चौकशीत दोषी आढळल्यास कंपनी आणि विक्रेत्यावर बियाणे कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तीव्र ठिय्या आंदोलनाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी प्रशासनाकडून तातडीने कारवाई न झाल्यास सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन पातूर कृषी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन आणि संबंधित कंपनी जबाबदार राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची तालुक्यात चर्चा सुरू असून, पातूरचे तालुका कृषी अधिकारी याबाबत कोणती पावले उचलतात, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: