सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ अंतर्गत सेंद्रिय शेतीकडे पाऊल; इर्जिक पद्धतीने राबविले प्रात्यक्षिक
नांदेड (Shri Panchmukhi Farmers Group) : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ च्या अनुषंगाने नांदेड तालुक्यातील मौजे कासारखेडा येथे शेतकरी गट आणि प्रशासकीय मार्गदर्शनातून सेंद्रिय शेतीचा जागर पाहायला मिळत आहे. पाणी फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली येथील श्री पंचमुखी शेतकरी गटाने एकत्र येत इर्जिक पद्धतीने २०० लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा विविध वनस्पतींचा पाला (पर्ण) गोळा करून, तो कुटून अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक तथा क्षेत्रीय अधिकारी प्रवीण खुळे यांनी हा अर्क तयार करण्याची सविस्तर कृती उपस्थित सदस्यांना समजावून सांगितली.
या प्रसंगी पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक विशाल इंगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "जमिनीचे आरोग्य सुधारणे आणि खताच्या मात्रा परीक्षण अहवालानुसार देण्यासाठी मृदा चाचणी करणे ही काळाची गरज आहे." यामुळे उत्पादनावरील खर्च कमी होऊन दर्जा सुधारण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटॉर वसंत जारिकोटे यांनी यापुढील काळात शेतकरी गटाने राबवायचे विविध उपक्रम आणि त्यातून मिळणारे गुणांकन याविषयी सविस्तर माहिती दिली. तर मेंटॉर कैलास पेरके यांनी प्रास्ताविकातून बीबीएफ पेरणी तंत्रज्ञान आणि उताराला आडवी मशागत करणे या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या (Shri Panchmukhi Farmers Group) उपक्रमात गटातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्र येऊन SOP (Standard Operating Procedure) पद्धतीचा अवलंब करत सहकार्याने गट शेती व 'स्मार्ट शेती' करण्याचा निर्धार केला. तसेच फार्मर कप स्पर्धेसाठी आमचा गट सज्ज असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवदास कडेकर, ओमप्रकाश कडेकर, किशोर शिंदे, शहाजी शिंदे, शिवकुमार नरवाडे यांच्यासह गटातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. गावचे सरपंच तानाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.