पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या NDA प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
मोदी-शाह भेटींनंतर चर्चांना उधाण; जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली, सुप्रिया सुळेंचेही सरकारविरोधात आक्रमक लढ्याचे निर्देश
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या NDA प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांवर आता खुद्द शरद पवार यांनीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण विरोधकांच्या भूमिकेतच असून पक्षाने त्याच दिशेने काम सुरू ठेवावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या मागील काही दिवसांतील पंतप्रधान मोदींसोबतच्या दोन भेटींमुळे राजकीय चर्चांना वेग आला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व खासदारांसह मोदींची भेट घेतली होती. तसेच सुप्रिया सुळे यांनी बजरंग सोनवणे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. या भेटींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना जोर चढला होता.
मात्र, पक्षाच्या दोन दिवसीय जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम देणारी भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवार आणि रविवारी झालेल्या बैठकीत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीदरम्यान काही जिल्हाध्यक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेस NDAसोबत जाणार का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी आपण विरोधातच असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही कार्यकर्त्याने संभ्रमात राहू नये, असा संदेश दिला. पक्षाच्या संघटनात्मक कामाला जोमाने लागण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सुप्रिया सुळेंचा सरकारविरोधात लढण्याचा संदेश
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही पक्षाच्या सरकारविरोधी भूमिकेवर बैठकीत भर दिला. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा संदर्भ देत त्यांनी पदाधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत ज्या पद्धतीने आवाज उठवला जातो, त्याचप्रमाणे आता रस्त्यावरही संघर्ष करण्याचे आवाहन केले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडण्यासोबतच जिल्ह्यांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या सूचनाही सुप्रिया सुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आणि पक्षाच्या कामाला वेग देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाध्यक्षांना दिले.
सुप्रिया सुळे यांनी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचेही बैठकीत जाहीर केले. शनिवार आणि रविवारी झालेल्या या बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
दरम्यान, मोदी आणि शाह यांच्या भेटींमुळे निर्माण झालेल्या NDA प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतचा संभ्रम दूर झाल्याचे मानले जात आहे.