Shelgaon Atrocity Case: चिखली तालुक्यातील शेलगांव जहांगीर येथील अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी
चिखली (Shelgaon Atrocity Case) : चिखली तालुक्यातील शेलगांव जहांगीर येथील अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पीडित महिलेला न्याय व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्लोबल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. काशीराम पैठणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, शेलगाव जहांगीर (Shelgaon Atrocity Case) येथील ऊषा रमेश साळवे व त्यांची मुलगी प्रतीक्षा साळवे या शेतात काम करत असताना जमिनीच्या वादातून काही जणांनी त्यांच्याशी वाद घालत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर काठ्या, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ऊषा साळवे यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच महिलेची साडी फाडून विनयभंग केल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असला, तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपींचे मनोबल वाढत असून पीडित कुटुंब भयभीत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
डॉ. पैठणे यांनी पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, (Shelgaon Atrocity Case) प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवावा तसेच पीडित महिलेला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनावर भाई प्रदीप अंभोरे संस्थापक अध्यक्ष भूमिमुक्ती मोर्चा, दीपक कस्तुरे, गजानन जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.