नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात कापड व्यावसायिक शैलेंद्र देवीदास रोडगे यांच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कामठीतील शैलेंद्र देवीदास रोडगे यांचा मृत्यू; पोस्टमार्टम अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार, पोलिसांचा तपास सुरू
नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात कापड व्यावसायिक शैलेंद्र देवीदास रोडगे यांच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कामठी (जुनी) पोलीस करत असून, मृत्यूमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेंद्र रोडगे हे घटनेच्या वेळी घरी एकटेच होते. दरम्यान, त्यांच्या मुलाने त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी वारंवार मोबाईलवर फोन केले, मात्र अनेक प्रयत्नांनंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलाने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजाऱ्यांनीही घराबाहेरून आवाज देत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु घरातून कोणतीही हालचाल जाणवली नाही.
घटनेची माहिती मिळताच कामठी (जुनी) पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता शैलेंद्र रोडगे हे बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान घरामध्ये औषधांच्या गोळ्या तसेच काही इंजेक्शन अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यामुळे या मृत्यूबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असून, प्रकरण अधिक गूढ बनले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील संबंधित साहित्य जप्त करून तपासासाठी पाठविले आहे.
या प्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.