पोलीस भरती आणि बँड्समन भरती प्रक्रियेत यश मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
अधिक गुण मिळवून देण्याचे आश्वासन देत विश्वास संपादन केल्याचा आरोप; न्यायालयाच्या आदेशानंतर BNS आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, अटक न झाल्यास आंदोलनाचा पीडितेचा इशारा
बारामती : पोलीस भरती आणि बँड्समन भरती प्रक्रियेत यश मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि मुंबई बँड पोलीस दलातील कॉन्स्टेबल मारुती करे यांच्याविरोधात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडितेने स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपींपैकी अमरनाथ कुंभार हे सध्या दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरे आरोपी मारुती करे हे मुंबई बँड पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. दोघांनी मिळून पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
2022 पासून पोलीस भरतीची तयारी
पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती 2022-23 पासून पोलीस भरतीची तयारी करत होती. 2024-25 च्या भरती प्रक्रियेदरम्यान बँड्समन पदासाठीही भरती होत असल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर आवश्यक प्रशिक्षण घेण्यासाठी तिचा संपर्क मुंबई बँड पोलीस दलातील कॉन्स्टेबल मारुती करे यांच्याशी आला.
करे यांनी बारामतीतील सूर्यनगरी परिसरात भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू केला होता. प्रशिक्षणाचे मैदान बारामती एमआयडीसी परिसरालगतच्या झाडीत होते. या ठिकाणी सुमारे 10 ते 12 मुली आणि 7 ते 8 मुले प्रशिक्षण घेत होती. पुढे सत्यमेव अकॅडमीच्या बेसमेंटमधील लेक्चर हॉलमध्ये भरतीसंदर्भातील मार्गदर्शन आणि व्याख्याने सुरू करण्यात आली.
प्रशिक्षणादरम्यान PSI अमरनाथ कुंभार यांची ओळख
सप्टेंबर 2025 पासून बँड्समन भरतीसाठी लेक्चर्स सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार यांची उपस्थिती होती. याच ठिकाणी त्यांची पीडित तरुणीशी ओळख करून देण्यात आली.
यानंतर मारुती करे यांनी संबंधित तरुणीला कुंभार यांना भेटणे आवश्यक असल्याचे सांगितले. सुरुवातीला तरुणीने त्यास नकार दिला. मात्र, "भरती व्हायचे असेल तर भेटणे गरजेचे आहे," असा दबाव टाकून तिला कुंभार यांच्याकडे नेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फ्लॅटवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप
पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर ती मारुती करे यांच्यासोबत अमरनाथ कुंभार यांना भेटण्यासाठी गेली. पुढे तिघेही करे यांच्या फ्लॅटवर गेले. तेथे काही वेळाने "थंड पेय घेऊन येतो" असे सांगून मारुती करे बाहेर गेले.
त्यावेळी अमरनाथ कुंभार यांनी खोलीचा दरवाजा बंद केल्याचा आरोप आहे. पीडितेने विरोध केला असता, "घाबरू नकोस," असे सांगत तिला पाणी देण्यात आले. ते पाणी पिल्यानंतर आपल्याला चक्कर आल्याचा दावा पीडितेने केला आहे.
त्यानंतर कुंभार यांनी तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान आपण वारंवार घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे.
भरतीतून बाहेर काढण्याची धमकी
पीडितेच्या तक्रारीनुसार, सुमारे पाऊण तासानंतर मारुती करे पुन्हा फ्लॅटवर आले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी ही घटना कोणालाही सांगितल्यास पोलीस भरती होऊ देणार नाही, तसेच भविष्यातील संधीही संपवू, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांकडे तक्रार, पण कारवाई नाही?
या घटनेनंतर पीडित तरुणीने 8 एप्रिल 2026 पासून सातत्याने बारामती ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या म्हणण्यानुसार कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
14 एप्रिल 2026 रोजी तिचा तक्रार अर्ज स्वीकारण्यात आला. मात्र, त्यानंतरही गुन्हा नोंदविणे किंवा आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, असा आरोप तिने केला आहे.
न्यायालयात धाव; आदेशानंतर गुन्हा दाखल
स्थानिक पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तक्रारीची दखल घेतल्यानंतर 5 जुलै 2026 रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
या आदेशानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अमरनाथ कुंभार आणि मारुती करे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
'आरोपींना संरक्षण दिले जात आहे' – पीडितेचा आरोप
गुन्हा दाखल होऊन चार ते पाच दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दोन्ही आरोपी पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे त्यांना प्रशासनाकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही तिने केला.
आरोपींना तातडीने अटक न झाल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचे सांगत पीडितेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
धरणे आंदोलनाचा इशारा
संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही, तर येत्या आठ दिवसांत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीडितेने दिला आहे.