शहराला स्वच्छ आणि हरित ठेवण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
हिंगोली : शहराला स्वच्छ आणि हरित ठेवण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. हिंगोलीतील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाढलेल्या झाडा-झुडपांची आणि अनावश्यक फांद्यांची कटिंग करून परिसर मोकळा करण्याचे काम आज ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केले.
सकाळच्या वेळी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना तसेच कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या लोकांना दाट झाडीमुळे त्रास होत होता. रस्त्यालगत वाढलेल्या फांद्यांमुळे चालणेही कठीण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन काही ज्येष्ठ नागरिकांनी हातसाधने घेऊन कटिंगचे काम केले.
त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो आणि इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले.