Sengaon Gharkul Yojana: सेनगाव तालुक्यात लाभार्थ्यांच्या घरकुल योजना लागू होऊनही ते वेळेत पात्र मिळत नसल्यावर जिल्हा परिषदेच्या संवैधानिक अधिकारी विवेक गायकवाड यांनी संबोधित केले.
सेनगाव (Sengaon Gharkul Yojana) : घरकुल योजनांतील पात्र लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान हप्ते तातडीने त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करून कोणत्याही लाभार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सोमवारी ता १३ जुलै रोजी दिले. सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित घरकुल योजना आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी ऋषीकेश होळकर, विस्तार अधिकारी माधव कोकाटे, विनायक देशमुख, जारे तसेच पंचायत समितीचे सहाय्यक अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील विविध घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी प्रत्येक योजनेतील प्रलंबित प्रकरणांची माहिती घेत लाभार्थ्यांना पहिला, दुसरा व तिसरा अनुदान हप्ता वेळेत मिळावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. लाभार्थ्यांना कार्यालयीन विलंबामुळे आर्थिक अडचणी किंवा गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घरकुलासाठी (Sengaon Gharkul Yojana) निवड झालेल्या काही लाभार्थ्यांच्या जागांबाबत वाद किंवा तांत्रिक अडचणी असल्यास त्या प्रकरणांची तातडीने चौकशी करून कायदेशीर मार्गाने प्रश्न निकाली काढावेत, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ वेळेत मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.
दरम्यान, सेनगाव तालुक्यात अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कंत्राटी सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या करून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरकुल योजनांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याची चर्चा प्रशासनात सुरू असून, कथित दलालांच्या साखळीला यामुळे आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बैठकीत घरकुल योजनांची (Sengaon Gharkul Yojana) प्रगती, प्रलंबित प्रकरणे, अनुदान वितरण, बांधकामाची सद्यस्थिती तसेच लाभार्थ्यांच्या अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी यावेळी दिल्या.