Fake Documents Case: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहाय्यक सचिवाला बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याप्रकरणी सेवेतून निलंबित केले गेले.
हिंगोली (Fake Documents Case) : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहाय्यक सचिव श्रीमती जे. आर. भंडारी यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली यांनी दि. 25 एप्रिल रोजी हा आदेश जारी केला. प्राप्त आदेशानुसार, श्रीमती भंडारी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी अनुकंपा तत्त्वावर समितीच्या सेवेत रुजू होताना इयत्ता दहावी उत्तीर्ण असल्याचे टी.सी. व इतर कागदपत्रे सादर केली होती.
मात्र, समितीने दि. 08 एप्रिल 2026 रोजी त्यांना दहावीच्या गुणपत्रिका व सनद सादर करण्याबाबत पत्र (Fake Documents Case) दिले. त्याला कोणतेही उत्तर न मिळाल्याने समितीने मुख्याध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हायस्कूल, पूर्णा यांच्याकडे शाळा सोडल्याच्या दाखल्याची शहानिशा केली. शाळेने दि. 02 एप्रिल 2026 च्या पत्रान्वये सदर टी.सी. बनावट असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर भंडारी यांना 11 एप्रिल 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर 16 एप्रिल 2026 रोजी त्यांनी उत्तर देताना इयत्ता नववी पास असल्याची दुसरी टी.सी. सादर केली.
प्रशासकांनी आदेशात नमूद केले की, दहावी पास असल्याचे बनावट टी.सी. सादर करून समितीची फसवणूक करण्यात आली. तसेच नववी पास टी.सी.वर कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती कशी दिली, हा प्रश्नही उपस्थित होतो. प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने व विश्वासघात केल्याने त्यांना निलंबित करण्यात येत आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे नियम 1967 मधील कलम 102 (5) व बाजार समितीच्या मंजूर सेवानियम 24 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात त्यांना नियमानुसार 1/2 वेतन अनुज्ञेय राहील व या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली आहे.
या (Fake Documents Case) प्रकरणी सचिव एस. पी. मुंडे यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यालयास पत्र दिले होते. त्यानंतर अनेकदा पत्रव्यवहार होऊन अखेर दि. 25 एप्रिल 2026 रोजी प्रशासकीय समितीने निलंबनाचा ठराव मंजूर केला.