Lord Mahavir Swami: रिसोड नगरीत जैन धर्मियांनी भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक महोत्सवाचे भव्य सेलिब्रेशन केले, ज्यात आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक प्रदर्शन दिसून आले.
भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा भक्तिमय उत्साहात साजरा
रिसोड (Lord Mahavir Swami) : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त रिसोड नगरीत भक्ती, उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणाचा संगम पाहायला मिळाला. संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर (Lord Mahavir Swami) येथून भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करत, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत पद्धतीने ही मिरवणूक पार पडली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले भाविक, हातात ध्वज, पताका आणि धार्मिक घोषवाक्ये देत वातावरण अधिकच भारावून टाकत होते.

या मिरवणुकीत ज्येष्ठ नागरिकांसह युवक-युवती आणि लहान मुला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. लहानग्यांच्या उत्साहाने आणि महिलांच्या सहभागाने मिरवणुकीला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले होते. मिरवणूक जैन मंदिर, अप्पा स्वामी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चांदणी चौक अशा प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मार्गक्रमणादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.
संपूर्ण परिसर "भगवान महावीर स्वामी की जय" (Lord Mahavir Swami) या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या सोहळ्यामुळे शहरात बंधुता, शांतता आणि एकात्मतेचा सुंदर संदेश पसरला. मिरवणूक पुन्हा जैन मंदिरात परतल्यानंतर भगवान महावीर स्वामी यांचा विधीपूर्वक अभिषेक व पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रार्थना करून आपल्या जीवनात अहिंसा, सत्य आणि संयम यांचे पालन करण्याचा संकल्प केला. या भव्य सोहळ्यामुळे रिसोड नगरीत दिवसभर धार्मिक उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवान महावीरांच्या शिकवणुकीचा संदेश जनमानसात पोहोचवणारा हा महोत्सव संस्मरणीय ठरला.