Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Ramraksha Pathan

संजय राऊतांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक; नागपुरातील बैठकीतील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या सकारात्मक वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


संजय राऊतांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक नागपुरातील बैठकीतील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

‘संवाद साधणारे आणि सकारात्मक नेते’ अशी गौरवोद्गारे; 18 जुलैच्या रामरक्षा पठण आंदोलनाच्या तयारीदरम्यान घडला उल्लेख

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या सकारात्मक वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राऊतांनी नागपुरातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे यांच्या संवादकौशल्याचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नागपुरात 18 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रमाच्या तयारीसाठी संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरीच्या निषेधार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह विदर्भातील अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या अलीकडील राजकीय भाकिताचा संदर्भ उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी भविष्यात भाजपमध्ये नेतृत्व पातळीवर बदल होऊ शकतात, असे विधान केले होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाऊ शकतात आणि त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पुढे येऊ शकते, असे मत व्यक्त केले होते.

याच संदर्भात चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. इतर पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध राखणारे आणि संवाद साधण्यात कुशल असलेले नेते म्हणून बावनकुळे यांची ओळख आहे, असे ते म्हणाले.

बैठकीत उपस्थित असलेल्या अंबादास दानवे यांनीही बावनकुळे यांचे कौतुक केले. सभागृहातील कामकाजादरम्यान ते नेहमी सकारात्मक भूमिका घेतात आणि नकारात्मक राजकारणापासून दूर राहतात, असे दानवे यांनी नमूद केले.

रामरक्षा पठण आंदोलनाच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत या विषयावर झालेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः विरोधी पक्षातील नेत्यांकडून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल व्यक्त झालेल्या सकारात्मक मतांमुळे या घडामोडींकडे लक्ष वेधले जात आहे.

दरम्यान, 18 जुलै रोजी नागपुरातील राम मंदिर परिसरात सामूहिक रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर मंदिराबाहेर जाहीर सभाही होणार आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाकडून व्यापक तयारी सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Related to this topic: