Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Rainfall Deficit

पावसाची उघडीप; शेतकरी चिंतेत

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.


पावसाची उघडीप शेतकरी चिंतेत

Rainfall Deficit |

कोवळी पिके पावसाअभावी धोक्यात

पानकनेरगाव : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. जून महिन्याच्या अखेरीस व जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दोन चांगल्या पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हळद, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात सापडली आहेत.

काही भागात केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी त्यातून जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नाही. परिणामी, काही शेतांमध्ये पिकांची उगवण झाली असून, ती आता उन्हाच्या झळांनी करपण्याच्या मार्गावर आहेत. तर अनेक शेतांमध्ये पेरलेले बियाणे अद्यापही काळ्या मातीच्या कुशीतच अडकून पडले आहे.

सेनगाव तालुक्यात यंदा सुरुवातीलाच मृग नक्षत्र लागल्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी खोळंबली होती. मृग नक्षत्राच्या टप्प्यात अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पेरणीसाठी पुरेसा ओलावा मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळ न दवडता पेरण्या उरकल्या. परंतु, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने कोवळी पिके तडफडत्या उन्हात करपू लागली आहेत. त्यामुळे पिकांची वाढ आणि पीक टिकविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महागडे बियाणे, खतांचा वाढलेला खर्च, मशागतीसाठी झालेला खर्च आणि मजुरीचे वाढते दर यामुळे यंदाची पेरणी आधीच खर्चिक ठरली आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणखी गडद होणार आहे.

प्रतिक्रिया : गजाननराव बाबाराव देशमुख (पाटील)

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज व गोल्ड लोन काढून खरीप पिकांची लागवड केली असून, आता त्यांच्या आशा केवळ पावसावर टिकून आहेत. ज्या शेतांमध्ये सोयाबीनचे कोवळे अंकुर बाहेर आले आहेत, त्यांना पुरेशा ओलाव्याअभावी वाढ खुंटण्याचा धोका आहे. दिवसभर पडणारे ऊन आणि वाढते तापमान यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, अंकुर सुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, ज्या शेतांमध्ये उगवणच झालेली नाही, तेथील बियाण्यांची उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया : शिवाजीराव दिनकरराव देशमुख

यंदा सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीसह इतर खरीप पिकांची लागवड झाली आहे. पेरणीची बहुतांश कामे पूर्ण झाली असून, आता सर्वकाही पावसावर अवलंबून आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गात आहे.

प्रतिक्रिया : शामराव भिमराव देशमुख, तालुका अध्यक्ष, भाजप

दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. दररोज वाढणारे तापमान, उष्ण व दमट वातावरण आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान विभागाने लवकरच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करावा आणि प्रत्यक्षातही दमदार पाऊस व्हावा, अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.

सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Related to this topic: