Patur Municipal Council: पातूर शहरात, नगरपरिषदेच्या राजकारणात 'पडाव संस्कृती'ने खातो, परंतु सध्या शैक्षणिक संस्थांची भूमिका राजकारणात वाढत असल्याचे दिसून येते.
पातूर (Patur Municipal Council) : पातूर नगरपरिषदेच्या राजकारणात गेल्या काही दशकांत मोठा बदल झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकेकाळी शहरातील ठेकेदारांच्या ‘पडाव संस्कृती’वर चालणारे राजकारण आता जवळपास संपुष्टात आले असून, त्याची जागा शैक्षणिक संस्था राजकीय आखाडे बनले तर काही व्यावसायिक गटांनी पडाव संस्कृती मागे टाकल्याचीचर्चा रंगू लागली आहे. सन 1975 ते 2010 या कालावधीत पातूर शहरातील राजकारण काही मोजक्या ठेकेदारांच्या भोवती फिरत होते. या ठेकेदारांचे लाकडांचे पडाव हेच राजकीय निर्णयांचे केंद्र मानले जात होते. (Patur Municipal Council) नगरपरिषद निवडणुका, उमेदवारीचे तिकीट वाटप, नगराध्यक्ष-उपाध्यक्ष निवड, स्थायी समितीचे निर्णय—अशा सर्व महत्त्वाच्या बाबी या पडावांवरच ठरत असल्याचे सांगितले जाते.
उमेदवारांना तिकीट मिळवण्यासाठी किंवा निवडून आल्यानंतर पद मिळवण्यासाठी या ठेकेदारांच्या पडावांवर वारंवार चकरा माराव्या लागत. शहरातील विकासकामांचे ठेके, तसेच नागरिकांची विविध कामेही याच माध्यमातून मार्गी लागत असल्याने पडावांवर मोठी गर्दी असायची. त्यामुळे काही ठेकेदारच शहराच्या राजकारणाची धुरा सांभाळत होते.मात्र, गेल्या दहा वर्षांत या पडाव संस्कृतीला उतरती कळा लागली आहे. आरा मशीन व पडाव ओस पडले असून, राजकारणाचे केंद्रबिंदू पूर्णपणे बदलले आहेत. पारंपरिक ठेकेदार गटांचा प्रभाव कमी होत गेल्याने नव्या सत्ताकेंद्रांचा उदय झाला आहे. सध्या (Patur Municipal Council) पातूर नगरपरिषदेचे राजकारण काही शैक्षणिक संस्थांच्या भोवती फिरताना दिसत आहे. उमेदवारांना तिकीट मिळवण्यासाठी किंवा राजकीय पाठबळासाठी संस्थाचालकांकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर शाळा व महाविद्यालये हीच राजकीय रणनीती आखण्याची केंद्रे बनली आहेत.
नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांचे नामांकन अर्जही अशाच संस्थांमधून निघाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या संस्थांचा स्थानिक राजकारणावर वाढता प्रभाव स्पष्ट होत आहे. शहरातील विशिष्ट मतदार गटांवर प्रभाव मिळवण्यासाठी काही संस्थाचालकांकडून नोकऱ्यांचे आमिष दिले जात असल्याचीही चर्चा आहे. आपल्या संस्थांमध्ये स्थानिकांना नोकरी देऊन त्यांच्यामार्फत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.
काही कर्मचाऱ्यांवर आपल्या नातेवाईकांना विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे सर्वसामान्य, स्वतंत्र विचारांचे उमेदवार निवडणुकीत मागे पडत असल्याची खंत व्यक्त होत आहे. या नव्या राजकीय व्यवस्थेमुळे विकासाभिमुख व सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी निवडणूक लढवणे कठीण झाले आहे. आर्थिक व संघटनात्मक ताकद असलेल्या गटांचे वर्चस्व वाढत असल्याने राजकारणातील समतोल बिघडत असल्याची भावना नागरिकांत आहे.
सध्या (Patur Municipal Council) नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शैक्षणिक संस्था व काही व्यावसायिक गटांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पातूर नगरपरिषदेतील सत्ता या नव्या युवकांचे हातात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीतच, पातूरच्या राजकारणाने ‘पडाव संस्कृती’पासून ‘संस्थाकेंद्रित सत्ताकारण’ असा प्रवास केला असून, या बदलाचा शहराच्या विकासावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.